Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उताऱ्यास योग्य शीर्षक दया.
वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, “आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे, तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत, सोबत भावत असेल, तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व फुलवण्यात साहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्याघरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्त्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. याउलट काही मुलं फार आक्रमक असतात. 'मी म्हणेन तेच खरं' अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रूक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणानं वावरू शकत नाहीत. तुम्हांला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं आहे, हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं, की अरसिक, बेजबाबदार बनवायचं; स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं, की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं; दिलखुलास जगायचं की रडतखडत, घाबरत घाबरत जगायचं, तुम्हीच ठरवा, स्वत:ला कसं घडवायचं.'' |
उत्तर
आपलं व्यक्तिमत्व आपल्या हाती
व्यक्तिमत्त्व हे अनेक घटकांच्या परिणामाने घडते. आपल्या बोलण्या-वागण्यापासून ते आपल्या विचारसरणीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम घडवते. आवडीनिवडी, सवयी, आरोग्य, बुद्धिमत्ता यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. अवांतर वाचन, मैदानी खेळ, चांगली मित्रमंडळी यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक विकसित होते. घरातील वातावरण, संस्कार यांचा आपल्या विचारांवर आणि वागणुकीवर परिणाम होतो. ज्या मुलांना स्वतंत्रपणे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, ती आत्मविश्वासपूर्ण आणि जबाबदार बनतात. अन्यथा काही मुले आक्रमक, बेजबाबदार आणि बेफिकीर वृत्तीची असतात. अशा मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो आणि ते चांगले मित्र बनू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करायचा, हे स्वतः ठरवावे. मनमोकळे, जबाबदार, आत्मनिर्भर बनायचे की संकुचित, अस्थिर राहायचे, हे प्रत्येकाच्या स्वतःच्या निवडीवर अवलंबून असते.