Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
अंधश्रद्धांचे थैमान
उत्तर
अंधश्रद्धांचे थैमान
‘नजीकच्या काळात शनी वक्री होत असून त्याचा वाईट प्रभाव आपल्या राशीवर पडून आपल्याला वाईट फळे मिळणार आहेत.’ ज्योतिषाच्या या भाकितावर विश्वास ठेवून, घाबरून एका गृहस्थाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची जीवनयात्रा संपवली. वृत्तपत्रात आलेल्या या बातमीवरून समाज मनावर अंधश्रद्धेचा किती जबरदस्त पगडा आहे हेच दिसून येते. बुवा, साधू, महंत, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलेल्या तरुण-तरुणींच्या शोकांतिकेच्या दुःखद वार्ता सतत आपल्या कानांवर येतात. माणसांचा दुःखद अंत करणारी अंधश्रद्धेची विषवल्ली समाजात सर्व ठिकाणी किती खोलवर पसरलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला ठयी-ठयी येतो.
आज एकविसाव्या शतकात एकीकडे नवनवीन शोध लागून विज्ञान क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरू असताना दुसरीकडे आपला समाज मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी न बाणता अंधश्रद्धेच्या घोर अंधारातच चाचपडत आहे. अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला मिळालेला शाप आहे.
तथाकथित बुवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवणे, देवाला केलेला नवस फेडण्यासाठी पळत येऊन मंदिराच्या दगडी भिंतीवर टक्कर देऊन डोके फोडून घेणे, नवस फेडण्यासाठी हजारोंच्या संख्येने देवापुढे बोकड मारून रक्तमांसाचा चिखल करणे, आगीवरून चालणे, लोटांगणे घालत देवळाला प्रदक्षिणा घालणे, गणपतीपुढील यज्ञात लक्ष मोदकांची आहुती देणे, केसात जट निर्माण झाली की त्या मुलीचा देवदासीत समावेश करणे, पोटी मुलगा आला नाही, मरणोत्तर क्रियाकर्मे त्याच्याकडून घडली नाहीत तर स्वर्गाचे दार खुले होत नाही ही समजूत, शुभकार्यात विधवेचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेणे, देवाच्या मूर्तीवर शेकडो लीटर दही, दूध, तुप यांचा वर्षाव करणे अशासारख्या असंख्य अंधश्रद्धा समाजात मूळ धरून आहेत.
पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळच्या जंगलात सात जणांचा निर्घृण संहार करण्यात आला. मुलगा व्हावा म्हणून बालकांचा बळी देण्याच्या घटना तर वारंवार ऐकायला मिळतात. मध्यंतरी केरळमध्ये एक भलामोठा पुत्रकामेष्ठी यज्ञ झाला. १००८ जोड्यांनी हा यज्ञ केला व शेकडो टन शुद्ध तूप, उत्तम तांदूळ व लाकूड यज्ञासाठी वापरले गेले. समाजात अंधश्रद्धा कशी फोफावली आहे याची अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. ग्रह, तारे, ग्रहण या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय माहिती आज विज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे तरी देखील ग्रहणकाल हा अशुभ असतो, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये यासारख्या अंधश्रद्धा असूनही समाजात मूळ धरून असल्याचे दिसते.
अंधश्रद्धा या केवळ अशिक्षित किंवा अल्पशिक्षितांतच असतात असे नाही तर उच्चशिक्षित व स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणवणारी कित्येक उच्चपदस्थ माणसेही अंधश्रद्धा असे आचरण करताना दिसतात. १९९२ साली महाराष्ट्रा दुष्काळ पडला होता, पावसाने ओढ दिली होती. तेव्हा प्रत्यक्ष राज्यपालांनी आवाहन केले की, ‘अमुक दिवशी सकाळी ११ वाजता पावसासाठी सर्वांनी प्रार्थना करावी.’ प्रार्थनेचे आवाहन करताना राज्यपाल आणि ते पाळणारे सर्व जण नेमकी एक मुद्द्याची गोष्ट विसरले की दुष्काळाचे प्रमुख कारण पावसाने दिलेला हिसका हे नाही तर महाराष्ट्राने पाण्याचा वापर नियोजनशुन्यतेने, अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केला हे आहे आणि त्यावर प्रार्थना हा उपाय नाही.
अंधश्रद्धांचे प्रमाण वाढतच असल्याचे आढळून येते. सध्याचा समाज अनेक ताणतणाव, दहशतवादाचे सावट इत्यादी समस्यांमुळे अस्थिर, भयग्रस्त झालेला आहे. वाढती लोकसंख्या, वाढते अपघात यामुळे आणखी समस्या निर्माण होते आहे. एकट्या मानवाची शक्ती विश्वातील भयानकतेला अपुरी पडणारी आहे याची जाणीव माणसाला अंधश्रद्धेकडे नेते. स्वतःच्या अगतिकतेतून, शोषणातून, अस्थिरतेतून मनाला प्रासंगिक दिलासा देण्यासाठी अंधश्रद्धेच भ्रामक पण हवाहवासा वाटणारा आधार माणसे घेतात. पण अंतिमत: तो माणसाला अधोगतीला नेणारा असतो.
अंधश्रद्धेची ही व्याधी नष्ट करायची असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या हजारो संस्था या कार्यासाठी पुढे यायला हव्यात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार समाजात करायला हवा. घटनेचा तर्कशुद्ध विचार करावयाचा, त्याला प्रयोगाची जोड देऊन मगच जरूर ते निष्कर्ष काढायचे. अशा पद्धतीने अनुभवाचा अर्थ लावण्याची कुवत निर्माण करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे व अंधश्रद्धा निर्मूलत करणे. १९७५ साली इंदिरा गांधीनी घटनादुरुस्ती करून नागरिकांची मूलभूत कर्तव्ये हा भाग समाविष्ट केला. या कर्तव्यांच्या यादीत शास्त्रीय दृष्टिकोनाचा मानवतावादी विचारांचा विकास करणे, चौकस बुद्धी वाढविणे यासाठी मनोवृत्ती सजग ठेवणे हे भारतीय नागरिकांचे प्रमुख कर्तव्य मानले आहे. प्रत्येक नागरिकाने जागरूकतेने कर्तव्य पालन केले पाहिजे. मानवी मूल्ये सर्वश्रेष्ठ मानून जगले पाहिजे. म्हणजे मग अंधश्रद्धांचे थैमान आपोआपच लयास जाईल व निकोप अशा विज्ञाननिष्ठ प्रगत समाजाच्या निर्मितीस सूरूवात होईल.