Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
गप्पा मारण्याचे व्यसन
उत्तर
गप्पा मारण्याचे व्यसन
एकदा मी कर्णबधिर मुलांच्या मंडळात गेले होते. त्यांच्यापैकीच एक मुलगा सापांबद्दल काही माहिती सांगणार होता. पण सगळे महिन्याभरांनी भेटलेले मित्र एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके गुंतले होते की, त्याच्याकडे कोणाचं लक्षच जाईना! बरं ओरडून, काहीतरी आवाज करून लक्ष वेधावं तर त्याचा काही उपयोग नव्हता, कोणालाही बोलायला आणि ऐकायला येत नव्हतं, तरी हावभावांनी, खाणाखुणांनी त्यांच्या जिवाभावाच्या मित्रांशी गप्पा मात्र रंगल्या होत्या. शेवटी त्याने लाईटच्या बटणाची उघडझाप केली आणि आपल्याकडे लक्ष वेधलं.
अबोल माणसांची ही कथा तर मग बोलणाऱ्या गप्पांबद्दल काय बोलावं? माणूस हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसऱ्याशी अनेक मार्गांनी संवाद साधायला आवडतो. माणसाला भाषा अवगत असल्यामुळे दोन माणसं एकत्र आली की त्यांच्या गप्पा सहज रंगतात.
काहींना तर सारखं बोलायला आवडतं. गप्पांचं त्यांना व्यसनच असतं. असं वाटतं की या लोकांचं तोंड चामड्याचं असतं तर फाट्न गेलं असतं. आपलं बोलणं दुसऱ्याला ऐकायचं आहे की नाही, त्यात त्याला रस वाटतो आहे की नाही याचा विचार ते करत नाहीत. त्यांचे विषय तरी काय असतात? उठल्यापासून मी काय-काय केलं? तोच तो कंटाळवाणा विषय. काहींच्या!बोलण्यात नुसती दुसऱ्याची टिंगल-टवाळी, स्वत:बद्दलची प्रौढी आणि स्वत:ला सर्व काही समजतं असा भाव. अशा, लोकांशी गप्पा करणं म्हणजे शिक्षा वाटते. लोक त्यांना टाळतात. त्यांच्यापासून लांब राहतात किंवा त्यांचं बोलणं मध्येच तोडून टाकतात. पण ते या व्यसनाच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना अपमानही कळत नाही.
काही व्यक्तीचं बोलणं मात्र श्रवणीय असतं. त्यांच्या सहज गप्पाही तर्कशुद्ध, स्पष्ट विचार व्यक्त करतात. अनुभवांची गाठोडी त्यातून उलगडतात. कधी एखाद्या राजकीय, सामाजिक घटनेवर किंवा कधी वाचलेल्या पुस्तकावर ते मतप्रदर्शन करतात तेव्हा आपणही विचारसमृद्ध होतो. अशा व्यक्तींना थोडं बोलतं करून ऐकत राहणं हा एक आनंद असतो.
गप्पांतून माणूस सहज व्यक्त होतो. तो जसा आहे तसा कळतो. विरंगुळ्यासाठी, ताण कमी करण्यासाठी, मार्गदर्शन मिळविण्यासाठी माणसं गप्पा मारतात. गप्पांमुळे चित्त हलकं होते. खेड्यातले वड, पिंपळांचे पार, नदीकाठ, समुद्रकाठ, कॉलेजकट्टे, बागा हे वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांचे गप्पांचे अड्डे ओसंडून चाललेले असतात.
आज तर फोन आणि मोबाईलमुळे एकमेकांना न भेटताही गप्पा मारता येतात. त्यात एसएमएसच्या लिखित गप्पांचीही भर पडली आहे. गप्पांचं व्यसन असणारी माणसं या सगळ्या गो्ष्टीचा अवलंब करतातच. पण एखादा माणूस त्यांच्या तावडीत सापडला की, ते त्यांना हवं आणि नको असलेलं सारं ऐकवितात. त्यांनी कितीही वेळा घड्याळाकडे पाहिलं तरी ते त्यांना सोडत नाहीत. समोरच्या माणसाची मोठी कठीण परिस्थिती होते. त्यातच झोप आली असेल तर त्याचं रागात रूपांतर होतं. म्हणुन गप्पा मारताना वेळेचं भान, मनावर संयम, आपल्या बोलण्यामुळे कोणात गैरसमज होणार नाहीत ना याची काळजी घ्यायला पाहिजे. कारण शब्द हे एक शस्त्रही आहे, म्हणुनच ते जपून वापरलं पाहिजे.
या शस्त्राचा विधायक उपयोगही होतो. रविकिरणमंडळाची निर्मिती अनेक कवीलेखकांच्या साहित्यिक गप्पांतूनच झाली. एखाद्या मोठ्या माणसाला मुलाखतीद्वारे बोलतं करून त्याच्याशी गप्पा मारत त्याच्या जीवनकार्याविषयी माहिती करून देणारी गप्पाष्टकं खूपच रंगताना आपण पाहतो-ऐकतो. त्यातून ऐकणाऱ्या गप्पा असोत की विवाहासाठी मुली पाहताना किंवा नोकरीसाठी मुलाखत घेताना मारलेल्या हवा-पाण्याच्या गप्पा असोत, त्या आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत.
आजकाल या कम्युनिकेशन स्किलला खूपच महत्त्व आहे. लोकांना बोलते करणं, त्यांना हव्या त्या विषयावर बोलायला लावणं, सूचक प्रश्न विचारणं, यात करिअर करणंसुद्धा आज शक्य आहे.