Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
हुंडा-एक सामाजिक समस्या
उत्तर
हुंडा-एक सामाजिक समस्या
आमच्या ताईचे लग्न जमले होते. खरे पाहता, ही किती आनंदाची गोष्ट; पण मला आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजीच दिसत होती. असे का? मला पडलेला हा प्रश्न मी कोणाला विचारणार? हळूहळू मला अंदाज आला की, काहीतरी पैशांची अडचण असावी. ताईच्या सासरच्या लोकांची आमच्याकडून खूप मोठ्या रकमेची अपेक्षा होती आणि त्याचेच आईबाबांना ओझे झाले होते. या प्रसंगामुळेच प्रथम माझी ‘हुंडा’ या शब्दाशी ओळख झाली आणि मग वरचेवर तो भयसूचक शब्द माझ्या कानी पडू लागला, वाचनात येऊ लागला.
‘हुंडा’ ही आपल्या समाजातील खरोखर एक दुष्ट प्रथा आहे. या प्रथेची मुळे पुरातन काळापासून आढळतात. बहुधा हुंडा हा वरपक्ष वधूपक्षाकडून हक्क म्हणून वसूल करतो. फारच थोड्या जातींत मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. पूर्वी या हुंड्याला ‘वरदक्षिणा’ या गोंडस नावाने गौरवले जात असे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला कमी लेखले जात असे आणि या कमीपणाची भरपाई हुंड्याने केली जात असे.
आज स्त्रीने हे सिद्ध केले आहे की, ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही. आज मुली भरपूर शिकतात. कुठलाही सुविदय पुरुष सुशिक्षित स्त्रीचीच पत्नी म्हणून निवड करतो. म्हणजे शिक्षणाचा खर्च दोघांनीही केलेला असतो.
आज बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असतात. म्हणजे आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारीही त्या उचलत असतात. त्याशिवाय घर, कुटुंब आणि अपत्ये यांसाठीही घरातील स्त्री सतत कष्ट उपसत असते. अशा परिस्थितीत तिच्या जन्मदात्यांकडून धनाची वा इतर भेटींची अपेक्षा करणे हे फार दुष्टपणाचे लक्षण आहे.
आज ‘हुंडा’ या दुष्ट प्रथेचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अधूनमधून दिसून येतात. मुलीच्या सासरच्या लोकांकडून वारंवार अनेक मागण्या झाल्यामुळे कित्येक विवाहित मुली आत्महत्या करतात. कित्येकदा हुंड्याच्या हव्यासासाठी सुनेला जाळण्यापर्यंत सासरच्या माणसांची मजल जाते.
वरपक्षाकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे कित्येक गरीब घरातील मुलींचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे मुलीचा जन्म हा मातापित्याला संकटच वाटू लागतो. काही समाजात मुलींना जन्मतःच मारले जाते, तर काही ठिकाणी मुलीचा जन्मच नाकारला जातो. हे खरोखरच दुःखदायक आहे. खरे तर स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत, दोन पाय आहेत. एक पाय आपण कमकुवत ठेवला, तर लुळापांगळा समाज प्रगती करू शकेल काय?
खरे पाहता, हुंड्याला कायदयाने बंदी आहे, पण आपल्या समाजात कायदा गुंडाळून ठेवून अनेक पळवाटा काढल्या जातात. तेव्हा ही दुष्ट प्रथा कायदयाने बंद होणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधन व्हायला हवे. प्रत्येक मुलाने व प्रत्येक मुलीने ‘मी हुंडा घेणार नाही’ किंवा ‘मी हुंडा देणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. तरच या अनिष्ट प्रथेला कायमचा पायबंद बसेल.