Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
खेळांचे जीवनातील स्थान
उत्तर
खेळांचे जीवनातील स्थान
“आई, मी खेळायला जाऊ का?”
“इंग्रजीचे शब्द पाठ झाले का? विज्ञानाचा धडा वाचला का? गृहपाठ पूर्ण झाला का? उद्याचं दप्तर भरलं का?”
आई आणि मुलं यांची ही प्रश्नोत्तरं रोज घराघरांत चाललेली असतात. यातून लक्षात येतं की, आईच्या दृष्टीने खेळाचा प्राधान्यक्रम सर्वांत शेवटचा आणि मुलाच्या दृष्टीने तो सर्वात पहिला. आईला हेही माहीत असतं की, खेळायला गेलेला मुलगा परत येण्याची सकती केल्याशिवाय मनाने येणार नाही. कारण ती त्याची मनापासूनची आवड आहे. खेळात रंगून जाणं, हा त्याचा स्वभाव आहे.
इतका अग्रक्रम ज्या विषयाला असतो तो विषय बाल्यावस्थेबरोबरच संपतो. जसजशा इयत्ता वाढत जातात तसतसा खेळ खाली-खाली, शेवटी ढकलला जातो. ‘सहामाहीचे गुण बघा. आतातरी खेळ कमी करा.’, ‘नुसतं खेळून परीक्षेत पास होता येत नाही.’ ‘खेळ तुझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करील.’ असं जाता-येता ऐकून घ्यावं लागतं आणि नाइलाजाने मूल खेळाला आपल्या जीवनातून हद्दपार करतात.
जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर खेळाचं जीवनातलं स्थान अनन्यसाधारण आहे. खेळ माणसाला तणावापासून दूर ठेवतात. जीवनातलं अपयश, दुःख, निराशा यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत देतात. त्या गोष्टीकडेही खिलाडू वृत्तीने पाहायला शिकविता. खेळामुळे व्यायाम घडतो. स्नायू आणि सांधे लवचिक राहतात. त्यामुळे मनाचं बळ वाढतं आणि आत्मविश्वास मिळतो. बालपणात खेळाशिवाय त्याला दुसरं काहीच नको असतं. व्यसनासारखी तो आसक्ती असते. पण त्यातून लहान मूल कितीतरी गोष्टी शिकतं आणि जगाचा अनुभव घेतं.
मुलं शाळेत जाऊ लागली की, त्यांच्या खेळांवर थोड़ी वेळेची बंधन येतात. खेळाबरोबर अभ्यासही करावा लागतो. शाळेतही खेळांचे तास असतात. ते ठेवण्यामागेही मुलांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं, पराभव झाला तरी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारावा, दुसऱ्याचा विजय आनंदाने साजरा करावा अशी मनोवूत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश असतो. मात्र त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्यामुळे बहुतेक शाळांमध्ये खेळांचं चित्र निराशाजनक दिसतं. आनंदासाठी खेळ हा विचार दुर्लक्षित होतो. एक तर स्पर्धेसाठी खेळा नाही तर खेळाचा तासाला अभ्यास करा. असा सल्ला दिला जातो आणि एकदा का मुलगा-मुलगी दहावीला गेले की, त्यांच्या खेळाच्याच नव्हे तर आनंद मिळविण्याच्या सर्व वाटा बंद होतात.
क्रीडा ही एक कलाच आहे. त्यामुळे कलेचं माणसाच्या जीवनात जे स्थान आहे तेच क्रीडेचं आहे. परंतु आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या देशात खेळण्याच्या सुविधा अपुऱ्या आहेत. सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर क्रिकेटचे रंगलेले डाव पाहिले की, याची कल्पना येते. खेळाची साधनं आणि मैदानं ही मुलानां, घराजवळ सहज उपलब्ध झाली पाहिजेत. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला देश ऑलिंपिक पदकात खालून तिसरा-चौथा कुठेतरी असतो. ही एकच गोष्ट खेळाला आपण किती नगण्य स्थान दिले आहे याचा पुरावा आहे. स्पर्धा संपेपर्यत त्याची चर्चा होत राहते. क्रीडासंस्कृती रुजविण्याच्या घोषणा होतात. परंतु मग पुढचं ऑलिंपिक येईपर्यंत सारं कसं शांत-शांत असतं!
भारतात क्रिकेटचं वेड फार आहे. त्यामुळे त्यापेक्षा अवघड, अधिक कौशल्य आवश्यक असणाऱ्या खेळांची देखील प्रचंड उपेक्षा होते. ज्या खेळांमध्ये कमी गुंतवणुक करावी लागते, असे खो-खो, कबड्डी यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
‘खेळ’ या विषयाच्या अनुषंगाने असे अनेक विचार मनात येतात. कारण त्याचं जीवनातल महत्त्वच तेवढ आहे. या जीवनालासुद्धा परमेश्वराची क्रीडा म्हटलं जातं, ते काही उगीच नाही.