Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
सैनिकाचे मनोगत
उत्तर
सैनिकाचे मनोगत
१५ ऑगस्ट, २०२२ भारताला स्वातंत्रय मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. म्हणून आमच्या बाईनी आम्हाला शाळेत एक उपक्रम दिला. आपल्या परिसरात कोणी सैनिक असतील तर त्यांची मुलाखत घ्यायची. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगाच सैन्यात गेला होता आणि सुट्टीनिमित्त गावीही आला होता. ती संधी मी साधली. परंतु त्यांच्या मनोगतातून मला जी माहिती मिळाली त्याने मी स्तिमित झालो! जवळजवळ ते दोन तास बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो!
‘सैन्यात भरती होण्यासाठी खडतर असं प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. त्यासाठी मुळातच प्रकृती , छाती आणि दृष्टी सुदृढ असावी लागते. प्रशिक्षण काळात विविध कैशल्यं शिकविली जातात. शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतली जाते. त्यानंतर गरज असेल त्या ठिकाणी ‘पोस्टिंग’ केलं जातं. सध्या मी काश्मीर खोऱ्या अनंतनाग जिल्ह्यात आहे. तो भाग दहशतवाद्यांचा मोठाच अड्डा आहे. सीमेपलीकडून आपल्या हद्दीत घुसखोरी होते आहे का? वेश बदलून अतिरेकी कारवाया करत आहेत का? हे आम्हाला डोळ्यांत तेल घालून पाहावं लागतं. तिथला निसर्गही अतिशय प्रतिकूल आहे. हवामान अत्यंत लहरी आणि सतत बदलणारं! थंडीत शून्याच्या खाली पारा ४-५ अंशापर्यंत घसरतो, पहाडी प्रदेश, थंडगार वारा, बर्फवृष्टी याला तोंड देत-देतच पहारा द्यावा लागतो. कधी-कधी अशा ठिकाणी जावं लागतं, जिथे कुटुंबाला नेता येत नाही. त्यांची सुरक्षा आणि शिक्षण याबद्दल सारेच प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे बायको, मुलं इथे आणि आम्ही एकटे तिकडे असंच आमचं आयुष्य असतं. तिथे मग देशाच्या निरनिराळ्या भागातून, आमच्यासारखे घरदार सोडून आलेले दुसरे सैनिकच आमचे जिवाभावाचे साथी बनतात. तिथे जात, धर्म, भाषा काहीही आड येत नाही. आम्ही सर्व जण फक्त भारतीय असतो.
कधी देशाच्या एखाद्या भागात कुठे भूकंप होतो, पूर येतो, वादळ येतं किंवा जातीय दंगे उसळतात अशा ठिकाणी आम्हाला मदतीला जावं लागतं. संकट कितीही मोठे असो, एकदा का तिथे सैन्याला पाचारण केलं की सैनिकांच्या तुकड्या पोहोचताच शिस्तबद्ध कामाला सुरुवात होते. लोकांच्या मनातील भीती जाण्यासाठी सैनिक संचलन करतात. लोकांना जणू तो संदेशच असतो की, आता तुमची जबाबदारी सैनिकांवर आहे आणि तुम्ही अगदी सुरक्षित आहात.
सरकारही आमची खूप काळजी घेतं. आम्हाला योग्य पगार, आमच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये सवलती मिळतात. प्रसंगी प्राण देण्याचीही तयारी सतत ठेवावी लागते. त्या मोबदल्यात या गोष्टी आम्हाला मिळतात. आमच्यानंतर आमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाणार याचा आम्हाला विश्वास असतो आणि देशासाठी, चांगल्या, उदात्त कामासाठी आमचं आयुष्य खर्ची पडणार याचं समाधान असतं.
तरीही लढाईच्या प्रसंगात एखादा बरोबरचा सैनिक शत्रूच्या हल्ल्यात बळी जातो तो प्रसंग, तो दिवस आम्ही विसरू शकत नाही. काही क्षणांपूर्वी धडधाकट असलेला आमच्याबरोबर लढणारा सैनिक गतप्राण होतो तेव्हा जीवनाची क्षणभंगुरता कळते. असं मृत्यूचं नाट्य आमच्याभोवती सततच घडत असतं. त्याप्रसंगात प्रियजनांच्या आठवणी आणि देशवासीयांचं प्रेम एवढाच आमचा सहारा आणि विरंगुळा असतो.
काही सैनिकांना लढाईत कायमचं अपंगत्व येतं. त्यांचे क्लेश तर पाहवत नाहीत. दऱ्या डोंगरातून हिंडणाऱ्या सैनिकाला चाकाच्या खुर्चीशी जखडून राहावं लागणं यांसारखी दुसरी शिक्षा नाही. मात्र आमच्यावर उपचार मोफत आणि उत्तम होतात. अशा खूप काही कथा आणि व्यथा आहेत. पराक्रम, शौर्य, अभिमान, मरणांतिक वेदना, मृत्यू आणि विरह हे आमचं जीवन आहे. परंतु कुठेतरी त्या त्यागाचं मोल होतं, हे पाहून आनंदही आहे. आमच्यावर गीतं लिहिली जातात, चित्रपट निघतात आणि मुख्य म्हणजे प्रत्येक देशवासीयाच्या मनात आमच्याबद्दल प्रेम आणि अभिमान असतो.