Advertisements
Advertisements
प्रश्न
खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
- टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
- 'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
- 'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॉक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
उत्तर
1. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे: भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील 'आग' हा शब्द संस्कृतमधील 'अग्नि' या शब्दापासून आला आहे.
ब. अर्थांतील बदल स्पष्ट करणे: काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या 'शहाणा' म्हणजे 'अतिशहाणा' हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणार्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात. उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे:
एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे: भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद करणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य आह.
2. लेखक 'भाभा ऑटामिक रिसर्च सेंटर'च्या ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असताना तेथे त्यांच्यासह सुमारे शंभर मुले-मुली दाखल झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी नेमलेल्या सर्वांना पुरेल एवढे काम बार्कमध्ये आहे का, असा प्रश्न प्रशिक्षणार्थींना पडला होता. त्यावेळी डॉ. होमी भाभा यांनी त्यांना ’तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचे ते आपणच ठरवले पाहिजे. बॉसने आपल्याला सांगितलं असेल तेवढंच काम करायचं आणि काही सांगितलं नसेल तेव्हा आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही चुकीची गोष्ट आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे.“ असे मोलाचे मार्गदर्शन केले. लेखकाने त्यांनी दिलेल्या या सूचनेचे तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर आपले काम आपणच शोधल्यास 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती खरोखरच निर्माण होत असल्याचा अनुभव घेतला. म्हणजेच, एखादे काम करताना वरिष्ठ सांगतील तेवढे आणि तेवढेच न करता आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. स्वत: जबाबदारी घेऊन, स्वप्रेरणेने अधिकाधिक कष्ट घेऊन ते काम पूर्ण केले पाहिजे. आपण स्वत:च स्वत:ला घडवले, ऊर्जा मिळवली, स्वत:चे मार्ग स्वत:च शोधले, की 'स्काय इज द लिमिट' अशी परिस्थिती निर्माण होते.
3. कॉक्टस हा वाळवंटी प्रदेशामध्ये दुष्काळाचा सामना करत जगणार्या वनस्पतींचा जणू प्रतिनिधी आहे. वाUवंटात टिकून राहण्यासाठी निसर्गाने या झाडाला अनोखी वैशिष्ट्ये बहाल केली आहेत. पाऊस पडेल तेव्हा जे मिळेल ते पाणी कॉक्टस स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि कोरड्या हंगामामध्ये त्याची वाढ हळूहळू होत राहते. या झाडाच्या मुळाची रचना थोड्या वेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी असते. लांबवर मुळे पसरवून कॉक्टस सभोवतालच्या भागातील पाणी शोषून घेते. त्याचबरोबर कॉक्टसची अंगरचना पाणी साठवण्यासाठी अनुकूल अशी बनली आहे. त्याच्या अंगाचा कमीतकमी भाग कोरड्या, उष्ण हवेसमोर येतो. बहुतेक कॉक्टसची रचना घडीदार असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा घड्यांचा उपयोग पन्हाळीसारखा होऊन पावसाचे पाणी थेट मुळापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर बाष्पीभवनापासून वाचण्यासाठी या झाडाला पानेच नसतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळे कॉक्टस हा थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा उत्तम नमुना आहे', हे विधान यथार्थ वाटते.