Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.
दीर्घउत्तर
उत्तर
- शेती: खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते. त्यावर अधिक लोकसंख्या पोसली जाऊ शकते. शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो.
- खाणकाम: चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात. खाणकाम आणि उद्योग या व्यवसायांमुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांच्या वस्त्या अशा परिसरात वाढतात, असे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. झांबियातील कटंगा तांबे खनिज पट्टा तसेच भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, याशिवाय पश्चिम युरोप, चीनमधील मांच्युरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलेशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश इत्यादी. खनिजांमुळे हे प्रदेश दाट लोकवस्तीचे बनले आहेत. काही खनिजांचे मूल्य एवढे जास्त असते की, विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशांत खनिजांचे उत्पादन घेतले जाते. अशा भागात लोकवस्ती दाट आढळते. असे प्रामुख्याने मौल्यवान व दुर्मीळ खनिजांच्या बाबतीत घडते. जसे सोने, खनिज तेल-वायू इत्यादी. उदा., ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश, नैऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश.
- वाहतूक: वाहतूक आणि महामार्गांमुळेही अशा प्रदेशांमध्ये जाण्या-येण्यास सुलभता असते, त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. याउलट जर जाण्या-येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशांत लोकसंख्येची घनता कमी असते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला. बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली. तिथे लोकसंख्या वाढली. सुवेझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाण-घेवाण किफायतशीर झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशांत लोकसंख्या एकवटलेली दिसते. भारताचे पूर्व आणि पश्चिमी किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश ही याची उदाहरणे आहेत.
- नागरीकरण: उद्योगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी यांमुळे जगातील अनेक प्रदेशांत नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदा. बृहन्मुंबई.
- राजकीय घटक व शासकीय धोरणे: वरील सर्वघटकांशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्यचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदा. सैबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसते. जपानच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक त्या देशातील टोकिओ शहरात राहतात. त्यामुळे तेथील सरकार लोकांना टोकिओ सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे.
shaalaa.com
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - मानवी घटक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?