Advertisements
Advertisements
प्रश्न
स्थलांतराचा देशातील लोकसंख्या रचनेवर होणारा परिणाम स्पष्ट करा.
उत्तर
व्यक्ती किंवा समूहाचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे तात्पुरते किंवा कायम स्वरूपात होणारे स्थानांतरण म्हणजे स्थलांतर होय. खरे म्हणजे एका जागी स्थिर होण्याचा, वस्ती करण्याचा मानवी स्वभाव आहे. त्यातूनच ग्रामीण किंवा शहरी वसाहती उदयास येतात.
मात्र, काही प्रसंगी काही आकर्षण किंवा अपकर्षण करणांमुळे व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने किंवा अनिच्छेने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात आणि स्थलांतराची प्रक्रिया घडून येते.
स्थलांतरास विविध प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत असतात. मात्र, या कारणांपेक्षाही स्थलांतरामागची प्रेरणा ही जास्त प्रभावी ठरते. आकर्षण आणि अपकर्षण प्रेरणा शेवटी स्थलांतरास प्रत्यक्ष उद्युक्त करतात. रोजगाराच्या संधी, आर्थिक विकास, शहरांचे आकर्षण, उच्च राहणीमान, शिक्षण, वैदयकीय वाहतूक यांसारख्या सेवा सुविधा यामुळे जेव्हा व्यक्ती किंवा समूह स्वेच्छेने स्थलांतर करतो, ते स्थलांतर आकर्षण कारणांमुळे घडून येते. याउलट नैसर्गिक आपत्ती, राजकीय सामाजिक संघर्ष, युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती, देशाची किंवा प्रदेशाची फाळणी, अशा परिस्थितीत जी व्यक्ती किंवा समूह स्थलांतरित होण्यास भाग पाडले जातात, तेव्हा त्यास अपकर्षण घटकांमुळे होणारे सक्तीचे स्थलांतर म्हणतात.
कोणत्याही कारणामुळे स्थलांतर झाले, तरी शेवटी त्याचा परिणाम हा स्थलांतरित देणाऱ्या आणि स्थलांतरित घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशांवर आणि देशांवर होतो.
स्थलांतरित देणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्या कमी होते, लोकसंख्या घनताही कमी होते. स्थानिक पायाभूत सेवा-सुविधा कमी प्रमाणात वापरल्या जातात. अनेक वेळेस स्थानिक पातळीवर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेती, ग्रामीण उद्योग यांसारख्या व्यवसायांना कार्यशील मजुरांची कमतरता भासते. लिंग गुणोत्तर सकारात्मक होते. याउलट, स्थलांतरित घेणाऱ्या परदेशातील लोकसंख्या नैसर्गिक पद्धतीने वाढते. लोकसंख्येची घनताही वाढते. घरांची मागणी वाढल्यामुळे घरांच्या किमती वाढतात, त्यातून झोपडपट्ट्यांची निर्मिती होते. स्थानिक सेवा-सुविधा, वाहतूक, वैदयकीय आणि शिक्षणाच्या सेवा-सुविधा यांवर प्रचंड ताण पडतो. आर्थिक आकर्षणे काळाच्या ओघात कमी आकर्षक ठरतात. यामुळे कधीकधी उलट स्थलांतरही घडून येते.
थोडक्यात, स्थलांतरामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोन्ही प्रदेशातील लोकसंख्या घनता व रचना, लिंग गुणोत्तर, कार्यशील आणि अवलंबित लोक यांचे प्रमाण अशा विविध घटकांवर परिणाम होतो.