Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात तुमच्या शाळेचा संघ विजयी. मा. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते सत्कार. |
|
कौतुकाचा वर्षाव | आनंदोत्सव |
दि. 15 डिसेंबर स्थळ - दयानंद सभागृह, कोपरगाव वेळ - सकाळी 11.00 |
वरील प्रसंगी विजयी संघातर्फे तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
उत्तर
सत्काराचा अविस्मरणीय क्षण
आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना जिंकल्यानंतर जितका उत्सव आम्ही साजरा केला होता, त्याहून कितीतरी अधिक आनंद आम्हाला सत्काराच्या बातमीमुळे झाला. माननीय जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते १५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कोपरगाव येथील दयानंद सभागृहात सत्कार होणार असल्याची बातमी आमच्यासाठी अत्यंत आनंदाची होती. आम्ही सगळेच खूप उत्साहित होतो. जरी मी संघाचा कर्णधार होतो, तरी या विजयात आमच्या संपूर्ण संघाचा समान वाटा होता.
सत्काराच्या दिवशी प्रेक्षकांमध्ये बसलेलो असताना अनेक विचार माझ्या मनात येत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या विजयी संघातील प्रत्येक सदस्याची आठवण होत होती. त्या वेळी मी एकटाच त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. विचारात असतानाच क्रीडाधिकाऱ्यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. सूत्रसंचालकाने कार्यक्रमाची सुरुवात करून सत्काराची घोषणा केली. व्यासपीठाकडे जाताना मला माझ्या सगळ्या मित्रांची खूप आठवण येत होती. मंचावर गेल्यावर सरांनी माझा सत्कार केला आणि तो क्षण माझ्यासाठी अत्यंत खास होता. माझे आई-वडील, शिक्षक, आणि मुख्याध्यापक टाळ्या वाजवत मला कौतुकाने पाहत होते, हे दृश्य खूप अभिमानास्पद होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी भाषण केले आणि आमच्या संघाचे व माझे मनापासून कौतुक केले. नंतर सूत्रसंचालकाने मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मंचावर बोलावले. जरी माझे काम मैदानात खेळणे होते, तरी मंचावर जाऊन बोलण्याची संधी मिळेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. तिथे जाताना माझे पाय थरथरत होते, आणि मी काय बोलणार आहे, याचा विचार माझ्या मनात नव्हता. पण मी तिथे पोहोचल्यावर अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे माझ्या भावना व्यक्त केल्या. भाषणाची तयारी नसतानाही प्रेक्षकांचे मन जिंकता आले, हे अनुभवताना खूप समाधान वाटले.
शाळेचे नाव उंचावल्याचा अभिमान मला होता. हा दिवस माझ्या आयुष्यात आनंद, उत्सुकता, आणि भीती अशा अनेक भावनांनी भरलेला आणि खूप खास ठरला.