Advertisements
Advertisements
प्रश्न
भाग वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
भाग वाटप म्हणजे लेखी भाग अर्ज शुल्कासह केलेल्या अर्जदारांना भागाचे वाटप करणे होय.
भाग वाटपाची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे:
- वाटप समितीची नेमणूक: भाग विक्री बंद झाल्यानंतर चिटणीस संचालक मंडळास भाग वाटपाची तयारी करण्याबाबत माहिती देतो. जेव्हा भाग विक्री इतकीच मागणी असेल किंवा जेव्हा कमी मागणीची स्थिती असेल तेव्हा संचालक मंडळ भाग वाटप करते. पण जेव्हा जास्त मागणीची स्थिती असेल तेव्हा मंडळ वाटप समितीची नेमणूक करते. वाटप समिती वाटप कशाप्रकारे करावे याची निश्चिती करून मंडळाला अहवाल सादर करते.
- वाटपाच्या प्रमाण निश्चितीसाठी संचालक मंडळाची सभा बोलवणे: संचालक मंडळ हे वाटप समितीने सुचवलेल्या सूत्रानुसार भाग वाटपाला मंजुरी देते. जेव्हा वाटप समिती भाग वाटपाचे सूत्र निश्चित करते तेव्हा सेबीचा प्रतिनिधी उपस्थित असतो. जर भाग सूचिबद्ध असतील तर वाटप सूत्रास भाग बाजाराच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली पाहिजे. जेव्हा वाटपास मंजुरी मिळते तेव्हा भाग अर्ज आणि वाटप यादी तयार केली जाते. या यादीमध्ये वाटपदाराचे नाव नमूद केलेले असते म्हणजेच अर्जदार ज्याला भागाचे वाटप केले जाणार आहे. या यादीवर अध्यक्ष व चिटणीस यांची स्वाक्षरी असावी लागते.
- भाग वाटपासाठी संचालक मंडळाचा ठराव: भाग वाटपासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत केला जातो. ठरावाद्वारे चिटणीसास भाग वाटप पत्र किंवा दिलगिरी पत्र पाठविण्यास अधिकृत केले जाते. चिटणीस सर्व भाग वाटपदारांना म्हणजेच अर्जदार ज्याचे नाव भाग अर्ज आणि भाग वाटप यादीमध्ये असते त्यांना भागवाटप पत्र पाठवतो. ज्याचे नाव भाग वाटप यादीमध्ये नाही त्यांना दिलगिरी पत्र पाठवतो आणि या पत्रा सोबत भाग अर्ज शुल्क परत करतो. इलेक्ट्रॉनिक/डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग वाटप करताना भाग वाटप पत्र पाठविले जात नाही. NSDL किंवा CDSL या डिपॉझिटरींना भाग वाटपाची माहिती कंपनीकडून कळविली जाते. यामध्ये अर्जदाराचा तपशील, भाग वाटप संख्या इ. बाबी असतात.
- भाग वाटप शुल्क स्वीकारणे: भाग वाटप शुल्क हे भाग वाटप पत्रामध्ये नमूद केलेले असते. ठरावीक कालावधीमध्ये हे शुल्क कंपनीने निश्चित केलेल्या बँकेमध्ये जमा करावयाचे असते. जानेवारी २०१६ पासून सर्व सार्वजनिक भाग विक्री व हक्क भाग विक्रीसाठी ASBA बंधनकारक आहे.
- त्याग पत्रासंबंधित व्यवस्था: असा अर्जदार ज्यास भाग वाटप केले आहे तो त्या भागांचे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे त्याग करू शकतो. त्याग करण्यासाठी अर्जदारास कंपनीच्या विहित नमुन्यातील त्याग अर्जासोबत मूळ भाग वाटप पत्र सादर करावे लागते. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर चिटणीस नवीन वाटपदाराचे नाव भाग अर्ज व वाटप यादीत समाविष्ट करतो.
- वाटप पत्र विभाजित करण्याबाबतची व्यवस्था: काही वेळा अर्जदार ज्याला भाग वाटप झाले आहे तो वाटप पत्रे विभाजित करण्यासाठी विनंती करू शकतो. विभाजित करणे म्हणजे भाग एक किंवा जास्त व्यक्तींच्या नावाने करणे. संचालक मंडळाची विभाजनासाठी मंजुरी घेतल्यानंतर चिटणीस विभाजन वाटप यादीमध्ये माहिती नोंदवतो आणि विभाजन पत्रे वाटप करतो.
- भाग वाटप विवरण पत्र दाखल करणे: चिटणीसास कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे भाग वाटप झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भाग वाटप विवरणपत्र दाखल करावे लागते. भाग वाटप विवरणपत्रात भाग वाटपदाराचे तपशील जसे की - नाव, पत्ता, भाग वाटपांची संख्या, भागाची दिलेली आणि देय रक्कम, इत्यादी माहिती नमूद केलेली असते.
- सभासदांची नोंद वही तयार करणे आणि भाग प्रमाणपत्राचे वाटप करणे: ज्या अर्जदाराने भाग वाटप शुल्क जमा केले आहे त्याचे नाव चिटणीस सभासद नोंदवहीमध्ये नोंदवितो. चिटणीस भाग वाटपापासून दोन महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र तयार करून त्याचे वाटप करतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?