Advertisements
Advertisements
प्रश्न
‘दुःखच नसते तर!’ या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
जगी सर्वसुखी असा कोण – सुख आणि दु:ख हे नाण्याच्या दोन बाजू – दु:ख़ नसते तर सुखाचे महत्त्वच नसते कळले – सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन चक्र।
उत्तर
दुःखच नसते तर!
जगामध्ये आपण पाहिले आहे की काही जण सुखी आहेत तर काही जण दु:खी आहेत. कोणीही संपूर्णपणे सुखी नाही किंवा संपूर्णपणे दु:खी नाही. म्हणूनच म्हटले जाते की “जगी सर्वसुखी असा कोण आहे?” या उक्तीवरून जगामध्ये सुख आणि दुःख हे दोन्हीही आहे. पण जगामध्ये दुःखच नसते तर काय झाले असते? याचा विचार कोणी केला आहे काय? नाण्याला किंवा कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतातच. तेव्हा एकाच बाजूचा विचार कसा चालणार?
सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आहे म्हणून दुःख असते हे कळते. तर दु:खच नसते तर सुखाची किंमतच आपणाला कळली नसती. कायम आपण सुखात लोळत पडलो असतो. कोणताही कामधंदा फार कष्ट घेऊन केला नसता. पैशाची किंवा म्हातारपणीच तजवीज केली नसती. त्याबद्दल किंवा भविष्यकाळाबद्दल कधी विचारच केला नसता. जेवढे समोर येते तेवढेच करायचे. जास्त कष्ट, जास्त विचार अशा गोष्टी कधी मनात आणल्याच नसत्या. कायम निवांतपणे हिंडायचे, फिरायचे आणि मजा करून बसावयाचे असे चाललेले असते. पण हे कोठवर चालणार. निवांत किती वेळ बसणार? मजा किती वेळ' मारणार? शेवटी प्रत्येक गोष्टीत्म काही मर्यादा आहे. ही मर्यादा नसली तर मजा मारणे, ऐषाराम या गोष्टींचासुद्धा माणसाला कंटाळा आला असता.
दुःख नसते तर सुखाचे महत्त्वच कळले नसते. कायम चैन, मौजमजा यामध्ये रोज तेच-तेच पाहून कंटाळा आला असता. सर्वत्र कंटाळवाणे जीवन झाले असते. कोणत्याही गोष्टीचे कौतुक वाटले नसते किंवा आनंद वाटला नसता. मग दुःख नसून चालले असते काय? माणसे दु:खाला घाबरतात हे चुकीचे आहे. दुःखामुळे सुख ही गोष्ट काय आहे? कशी आहे याची पूर्णकल्पना येते. दुःखामुळे माणूस जीवनात संघर्ष करणे, धडपड, दु:खाला सामोरे जाणे, धैर्यवान होणे अशा अनेक गोष्टी माणसाला कर्तृत्ववान बनवितात.
काहीतरी ध्येय माणसासमोर उभे राहते. कारण सुख हे कायम टिकणारे नसते. सुखानंतर दुःख येते. म्हणून माणूस धडपडत असतो, दु:खात टिकून राहण्यासाठी काही तजवीज करून ठेवले तेव्हा कोणालाही कायम सुख किंवा कायम दु;ख अशी अवस्था उपयोगी नाही. म्हणूनच निसर्गाने सुख-दु:खाचे चक्र निर्माण केले आहे आणि ते योग्यच आहे.
सुखामागून दुःख आणि दु:खापासून सुख हे पाहिजेच!