Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
उत्तर
फाटक्या पुस्तकाचे मनोगत
“ग्रंथपाल हसतो तेव्हा ग्रंथालय होते एक बाग
न कोमेजणाऱ्या असंख्य फुलांनी बहरलेली”
“ग्रंथ सुखाने फिरू लागतात हिरव्या कुरणावरून
हाक घालतात लहान मुलांसारखे उचलून घेण्यासाठी”
कवी मंगेश पाडगावकरांची ग्रंथांसंबंधीची ही एक कविता खूप आवडली होती, म्हणून एका ग्रंथालयाच्या शोकेसमधून मुद्दाम लिहून आणली होती. आता ती त्यांच्याच ‘जिप्सी’ नावाच्या काव्यसंग्रहात मला सापडली. तो संग्रह इतका जीर्णशीर्ण झाला होता की, त्याच्या कागदाचे हातात घेतले की तुकडे होत होते. आता यावेळी आपली रद्दीच्या गठ्ठ्यात नक्की रवानगी होणार अशी भीती त्याला वाटली की काय कोण जाणे? त्यानं खरंच मला उचलून घेण्यासाठी हाक मारली. ते माझ्याशी बोलू लागलं. गप्पा मारता-मारता आम्ही दोघंही भूतकाळात गेलो.
“किती वर्षे झाली माझा अभ्यास करून? सत्तर साल असेल. म्हणजे ३६ वर्षे उलटून गेली. एवढासा माझा जीव इतकी वर्षे तग धरून आहे. अधूनमधून तू कपाटातून काढतेस, मला वाचतेस आणि आठवणीत रमून जातेस. मला माहिती आहे यातली प्रत्येक कविता तुला आवडते. त्यातला अर्थ, शब्दसौंदर्य, कल्पनावैभव, कवीची जीवनाकडे पाहण्याची आनंदी वृत्ती, त्यांच्यातील जिप्सी वृत्ती, वातावरणनिर्मिती आणि एखाद्या कवितेतलं तत्त्वज्ञान हे सारं-सारं तुला प्रिय आहे तुझ्या शिक्षकांनी ती तुला जशी शिकवली त्याचीही आठवण तुझ्या मनात ताजी आहे. मला वाचताना तू नेहमीच तुझ्या कॉलेजच्या दिवसात रमून जातेस. माझ्यातल्या अवघड ओळींचा अर्थ, काही संदर्भ, दुसऱ्या कवितांच्या ओळी असंही काहीबाही तू माझ्या पानांवर लिहिलं आहेस. मला पुनःपुन्हा वाचताना तुल्य नवीन काही समजल्याचा आनंद होतो आणि म्हणूनच तू मला टाकून देत नाहीस. यानंतर माझ्या कितीतरी आवृत्त्या निघाल्या, पण तू दुसरी प्रत विकत घेतली नाहीस. अनेकदा मला चिकटवलंस, चिकटपट्टी लावलीस, पण पुनःपुन्हा मी तीन भागात फाटत-फाटत गेलो. चालायचंच?वयाचा परिणाम”
तुला वाटतं कॉलेजच्या दिवसातला सारा उत्साह, ताजेपणा माझ्यात दडून बसलेला आहे. प्रिय मैत्रिणींचा स्पर्श अजूनही माझ्यात तुला जाणवतो आहे.
“मी इतकी भित्री, इतकी भित्री असे कसे मग घडले
मज नव्हते ठाऊक, अजून नाही कळले”
ही कविता कॉलेजमध्ये प्रत्यक्ष कवीच्या तोंडून ऐकायचा योग आला होता. तेव्हा त्यातल्या विशिष्ट शब्दांवरच्या आघातांमुळे नवीन समजलेला अर्थ ती कचिता वाचताना आजही तुला आठवतो आणि ते क्षण उडून गेल्याचं दु:ख होतं. हे सारं मला माहीत आहे. तरीही आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे. मला माहीत आहे माझी पानं उलटून तू मला वाचू शकत नाहीस. मला उघडलं की, थोडा सहन न होणारा दर्प येतो. सगळीकडून मी खिळखिळा झालो आहे. माझी नवीन आवृत्ती आण! त्या कोऱ्या करकरीत गंधात मी माझं चैतन्यमय आयुष्य पुन्हा अनुभवीन. मी म्हणजे काही ऐतिहासिक, दुर्मीळ हस्तलिखित अथवा हस्तऐवज नाही. मी कुठेही नव्याने उपलब्ध आहे. त्यामुळे मला इतकं जिवापाड जपण्याचं कारण नाही.
मला त्याचं म्हणणं मुळीच पटल नाही. त्याची सगळी पानं मी व्यवस्थित लावली आणि एका प्लॅस्टिक पिशवीत ठेवली. त्याची एकच विनंती मी ऐकणार आहे. उद्याच त्याची एक नवीन प्रत घेऊन येणार आहे. तो मला माझं आयुष्य संपेपर्यत सोबत करेल.