Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
उत्तर
पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली
डॉ. सलीम अली थोर पक्षीतज्ज्ञ होते. आपल्या नव्वद वर्षाच्या आयुष्यातली ८० वर्षे त्यांनी पक्षी निरीक्षणात आणि संशोधनात घालवली. त्यांच्या सवयींचा अभ्यास करून, पक्षीजीवनावर अनेक ग्रंथ लिहून अभ्यासकांची मोठी सोय करून ठेवली. पक्षी निरीक्षणासाठी त्यांनी आपलं जीवन जणू समर्पित केलं होतं. जो उत्साह अकराव्या वर्षी होता, तोच नव्वदीतही टिकून होता. त्यांच्या लेखी पक्षी निरीक्षणाइतकं महत्त्ताचं काहीही नव्हतं, त्यामुळेच त्यांच्या जीवनावर दूरदर्शनसाठी चित्रीकरण करायला माणसं येणार होती, त्यावेळी बऱ्याच वर्षानी दर्शन देणाऱ्या ‘जेर्डोनचा कोर्सर’ या पक्ष्याला पाहायला ते सर्व कार्यक्रम रद्द करून गेले.
डॉ. सलीम अलीचं बालपण मुंबईत खेतवाडीत गेलं. त्यांच्या आईचं निधन ते तीन वर्षाचे असताना झाल्यामुळे मामांनी त्यांचा सांभाळ केला. मामा पट्टीचे शिकारी असल्यामुळे शिकारीची नाना हत्यारे आणि बंदुका घरात होत्या. आपणही चांगले शिकारी व्हावं असं छोट्या सलीमला वाटे. हातात बंदूक आल्यावर त्यांचं पहिलं लक्ष्य चिमण्या झाल्या. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ‘दि कॉल ऑफ स्पॅरो’ असं आहे. त्यांच्यामागे ही हकीकत आहे. चिमण्या टिपण्यासाठी ते एकदा तबेल्यात गेले तेव्हा चिमणीने बांधलेल्या घरट्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. त्यांच्या तोंडावर एक चिमणा पहारा देत होता. त्यांनी त्याचा वेध घेतला. चिमणा खाली पडला. सलीम अली पुढे काय होते पाहू लागले, तो दुसरा चिमणा आला आणि पहारा दे लागला. पुढच्या सात दिवसांत ८ चिमणे असे पहारा देण्यासाठी आले. ही नोंद सलीम यांनी आपल्या वहीत केली. तेव्हापासून पक्षीजीवनाविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं.
त्यांचे मामा अमरिद्यीन हे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सदस्य होते. त्यामुळे तिथल्या लोकांचं मार्गदर्शन त्यांना सहज मिळालं. शालेय जीवनात गणित या विषयाच्या भीतीमुळे ते फारसे चमकले नाहीत. १९१३. साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर प्राणिशास्त्राची पदवी घ्यावी असं त्यांना वाटत होतं. पण गणितामुळे ते जमल नाही. त्यावेळी त्यांचे जाबीरभाई नावाचे भाऊ ब्रह्मदेशात खाणधंद्यात होते. त्यांनी त्यांना तिकडे बोलावून घेतलं. तिथेही त्यांनी पक्ष्यांच्या मागावर जाता-जाता रबराचे मळे, फळबाग आणि वनराया पालथ्या घातल्या.
१९१८ साली ते तेहमिनाशी विवाहबद्ध झाले. तेहमिना जरी समृद्धीत वाढली होती. तरी तिला साधं जीवन, जंगलातली भटकंती आवडत होती. तिलाही पक्षी आणि प्राणी यांच्याबद्दल प्रेम होतं. चाकोरीबाहेरचं जीवन जगणाऱ्या सलीमशी ती अल्पावधीतच समरस झाली. शेवटपर्यंत तिने त्यांना साथ दिली. त्यांना आवडीचं काम करायला मिळावं म्हणून स्वत: नोकरी करून संसाराचा आर्थिक भार उचलला.
सुरुवातीच्या काळात पक्षी निरीक्षणासाठी जाताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असे. कडाक्याची थंडी, धुळीची वादळं, हिमवर्षाव अशी निसर्गाशी टक्कर देत की बैलगाडी तर कधी तट्टू यांच्यावरून प्रवास करावा लागे. साधनं अपुरी, खाण्या पिण्याचे हाल अशा परिस्थितीत सलीम अली पती-पत्नी तिथे जाऊन तंबू उभारत. मुक्कामाच्या ठिकाणी कधी पोलीस चौकी, कधी डाक बंगला तर कधी पडका गोठाही असे. पक्षी निरीक्षणात दोघंही दंग राहत.
प्रतिदिनी बारा मैल भ्रमंती असे. रविवारची सुट्टी वगैरे प्रकार नसत. कच्च्या, खाचखळग्यांच्या, डोंगरदरीतून वळणं घेत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागे. जळवा, माशा आणि डास यांचा त्रास अटळच होता.
डबाबंद अन्न महाग म्हणून ते आणीबाणीसाठी राखून ठेवलं जाई. रोजचा आहार म्हणजे डाळभात, केळं, दही, पपई, प्यायच्या स्वच्छ पाण्याची मारामार, तिथे स्नानासाठी पाणी मिळण कठीण, या गैरसोईपुढे ते कधीही अडून बसले नाहीत. प्राप्त परिस्थितीत हसतमुखाने, उमदेपणाने सहन करत, त्याला विनोदाची झालर लावत सर्वेक्षणाचं काम ते करीत.
सलीम अलीचे पूर्वसुरी म्हणजे ब्रिटिश आमदानीतले अधिकारी. भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत त्यातल्या काही लोकांची मतं विरोधी असली तरी सलीम म्हणत की, यावर वाद घालण्यापेक्ष आपण कामावर लक्ष केंद्रित करू या! त्यांचे प्राध्यापक इरविन स्ट्रेसमन यांना आपला अभ्यास, आपला वारसा सलीमचपुढे चालवतील, असा विश्वास वाटत होता. पक्षी निरीक्षण करता-करता निसर्ग, पर्यावरण परिसंस्था यांच्या अभ्यासाच्या दिशेनेही त्यांची वाटचाल सुरू होती.
सलीम अलीच्या ज्ञानाला कृतीची जोड होती. भारत हा शेतीप्रधान देश आहे, याचा त्यांना कधीही विसर पडलेला नव्हता. पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना, मानवी जीवनात पक्ष्यांचं अर्थशास्त्रीय स्थान ठरविताना सजीव साखळीतला एक घटक म्हणूनच त्यांनी पक्ष्यांचा विचार केला. पशू-पक्ष्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन भाबड्या भूतदयेचा नव्हता.
पक्षीविषयक अभ्यास हा चाकोरीबाहेरचा आणि तसा सामाजिक प्रतिष्ठा नसलेला. परंतु त्याचा त्यांनी जीवनभर ध्यास घेतला. सलग ६० वर्ष ते अभ्यासासाठी राहिले. पक्षीशास्त्रात त्यांचं नाव मोठं झालं. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. पद्मविभूषण, कितीतरी विद्यापीठांच्या डॉक्टरेट, सी. व्ही. रामन मेडल, दादाभाई नौरोजी प्राईंज, रवींद्रनाथ टागोर ही काही नमुऱ्यादाखल नावे.
एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे ज्ञानपिपासू सलीम अली मानवजातीला एक आदर्श मानावा लागेल. कारण सहकार्यासाठी ते खिळंबले नाहीत की श्रेय मिळविण्यासाठी ते अडखळले नाहीत. त्यांची जिद्द, कार्यावरची निष्ठा, तळमळ, समर्पित वृत्ती पाहून मन थक्क होतं. त्यांनी आपल्या कुटुंबीयांमध्येही पक्षीप्रेम चांगल्यापैकी रुजवलं. त्यांनी लिहिलेले ग्रंथ पुढील पिढीच्या अभ्यासकांना निरंतर मार्गदर्शक ठरणारे आहेत. आपल्यासारखे अनेक सलीम अली झाले पाहिजेत, याच एका इच्छेने त्यांनी पुस्तकलेखनाबरोबर निसर्गसहली, चर्चासत्रं, फिल्मशोज यांचं आयोजन केलं. त्यांच्या हाताखाली त्यांनी मोठा विद्यार्थिवर्ग तयार केला. रॉबर्ट ग्रब, विजयकुमार आंबेडकर, पी. कन्नन आणि जे. सी. डॅनियल हे त्यांचे काही विद्यार्थी आपापल्या शास्त्रात लौकिक राखून आहेत. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढली तरच त्यांचे विचार या भूमीत रुजले, असं म्हणता येईल. विद्यार्थिदशेतच त्यांचं चरित्र मुलांपुढे यायला हवं.