Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते’
या कवितेतील काव्य सौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर
‘रोज मातीत’ या कवितेच्या कवयित्री कल्पना दुधाळ असून ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे. भारतीय कृषी समृद्धीतील कष्टकरी स्त्रीचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हा विचार येथे व्यक्त केला आहे.
प्रस्तुत ओळींचा वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार करता शेतीची मशागत करून सरी-वाफ्यात कांदे लावते आहे मात्र कष्टकरी स्त्री ही कांदे लावण्याचे काम करत नसून कांद्याच्या रोपाच्या रूपात जणू काही स्वतःचा जीवच लावते आहे. जमिनीला जीवापाड जपते तेव्हा कुठे ती जमीन हिरव्या रोपांनी सजते आहे. जमिनीत लावलेल्या रोपांची हिरवी पान पाहून आपण सरी वाफ्यात लावलेली रोपे म्हणजेच काळ्या आईला गोंदतो आहे असे वाटते. या गोंदणाच्या रूपात तिला तिच्या भाळावरील गोंदणाची आठवण येते आहे आणि शेतातही गोंदणासारखी सर्वत्र नक्षी दिसते आहे.
येथे कवयित्रीच्या मनातील भावनांचा संवेदनशील आविष्कार होताना दिसतो. तिला त्या कष्टकरी महिलेचे आत्मसमर्पण दिसत असून ती जीव लावते म्हणजेच तहान भूक विसरून, उन्हातान्हात ती स्वतःला विसरते. कष्ट करत आहे ते केवळ संपूर्ण शेतकरी कुदुंबाला अर्थप्राप्ती व्हावी, सुख-समृद्धी लाभावी यासाठी. त्यामुळेच ‘गोंदण’ ही प्रतिमा संवेदनशील कल्पनेच्या मुळाशी आपणास घेऊन जाते. जमीन, गोंदण, सरी, वाफा, जीव, माती अशी प्रतिमाने प्रतीके योजून आशयही आपणास वैचारिक पातळीवर घेऊन जातो. अशाप्रकारे ही कष्टकरी शेतकरी महिला शेतीशी इमानप्रमाण राखत नांदते आहे. आपल्या कुुंबातील व्यक्तींना सुख-समाधान देते आहे. संसारालाही हातभार लावते आहे.