Advertisements
Advertisements
प्रश्न
उपनगरे
उत्तर
औद्योगिक क्रांतीनंतर उदयोग आणि कारखान्यांची वाढ होत गेली आणि त्यामुळे शहरांची अत्यंत वेगाने वाढ होत गेली. उदयोग आणि कारखान्यांमुळे रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर सुरू झाले. शहरांमधील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि या लोकसंख्येच्या दबावामुळे शहरांचा विस्तार होत गेला. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरांचे नगरात आणि नगरांचे महानगरात रूपांतर झाले. अनेक महानगरांची लोकसंख्या ही दहा लाखांच्याही पलीकडे वाढली. शहरांमधील जमीन आणि भूमी उपयोजनात मोठा बदल घडून आला. निवासी बांधकाम क्षेत्र कमी पडू लागले आणि त्यामुळे या महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात निवासी बांधकाम, वैद्यकीय शैक्षणिक सेवा-सुविधा असा विस्तार होत गेला, यालाच नागरी प्रसरण असेही म्हणतात.
जेव्हा महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात असे नागरी प्रसरण पाहायला मिळते, तेव्हा त्यातून उपनगरांची निर्मिती होते. खरं म्हणजे ही उपनगरे स्वतंत्र शहरेच असतात. मात्र त्यांचे एकंदरीत अस्तित्व हे मुख्य महानगरावरच अवलंबून असते; कारण महानगर हे या उपनगरातील लोकांना उपजीविकेच्या संधी पुरवते. त्यामुळेच दृश्यस्वरूपात जरी उपनगर हे वेगळे शहर असले, तरी हे उपनगर आणि त्याचे मुख्य महानगर यांच्यात रोजच खूप मोठ्या प्रमाणात संपर्क, देवाण-घेवाण, वाहतूक सेवा-सुविधा, लोकांचे दैनिक स्थलांतर असे परस्परावलंबन दिसून येते.