Advertisements
Advertisements
Question
जगात पशुपालन होणाऱ्या प्रदेशांबद्दल टीप लिहा.
Solution
मोठ्या कुरणांवर मोठ्या प्रमाणात जनावरांची पैदास करून त्यापासून मिळणारी प्राणिज उत्पादने जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात, या व्यवसायास व्यापारी पशुपालन म्हणतात. जगातील समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशांपैकी प्रेअरी, पंपास, स्टेप्स, वेल्ड आणि डाऊन्स गवताळ प्रदेशात व्यापारी तत्त्वावर पशुपालन केले जाते. उत्तम हवामान, समशीतोष्ण कटिबंधीय स्थान, अतिशय उच्च दर्जाची पोषणमूल्य असणारी नैसर्गिक सराव कुरणे, सर्वोत्तम पशुधन, आर्थिक विकासामुळे, पशुवैद्यक आणि पशूंची शास्त्रोक्त पद्धतीने देखभाल, दळणवळण आणि वाहतुकीच्या साधनांची सहज उपलब्धता, स्थानिक बाजारपेठ तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी यामुळे या क्षेत्रात व्यापारी पशुपालन विकसित झाले आहे.
मात्र त्याच वेळेस जगातील काही अन्य भागात उदरनि्वाहाचे पशुपालन केले जाते. वाळवंटी प्रदेश हवामानाचे प्रदेश जेथे तापमान खूप जास्त आणि पर्जन्यमान खूप कमी असते, अशा प्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थानिक कुरणांवर विविध पशूंचे संगोपन करून तेथील लोक आपली अन्नाची गरज भागवतात. याला उदरनिर्वाहक पशुपालन म्हणतात. आफ्रिकेतील बहुतांशी भाग अशा उदरनिर्वाह पशुपालनात अग्रेसर आहे.
आग्नेय आशियातील मोसमी हवामानाच्या प्रदेशात पशुपालन हा शेतीस पूरक व्यवसाय म्हणून केला जातो. पावसाळ्यातील कालखंडात येथे शेती व्यवस्था प्रमुख व्यवसाय असतो. मात्र पावसाळ्यानंतर येणाऱ्या कोरड्या ऋतूत पशुपालन हा पूरक व्यवसाय करून शेतकरी आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करतात.
अशाप्रकारे जगात पशुपालनाचे विविध स्वरूप पाहायला मिळते.