Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
Solution
महात्मा फुले-एक थोर समाजसुधारक
महात्मा जोतीबा गोविंदराव फुले हे एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक होते. समाजपरिवर्तनाच्या चळवळीचा पाया त्यांनी घातला. मानवी समानतेचा पुरस्कार करणारी आणि जातिभेद व धर्मभेद यांना धिक्कारणारी विचारसरणी जोतीरावांनी आवेशाने सांगितली. समाजातील कनिष्ठ वर्गाच्या आर्थिक व सामाजिक शोषणाविरूद्ध त्यांनी लढा दिला. समाजात अस्पृश्य गणल्या गेलेल्या पददलितांचे ते पहिले उद्धारक होते.
महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गोऱ्हे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले, शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेड लागले होते. परंतु घरून विरोध झाला. मार्गात अनंत अडचणी आल्या तरीही जोतीरावांनी इंग्रजी शाळेतून शिक्षण पूर्ण केले.
‘ज्ञान, ही एक, शक्ती आहे’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
स्त्री-शुद्रांनी शिक्षण घेतले तरच त्यांच्यातील मानसिक गुलामगिरी नाहीशी होईल व त्यांची उन्नती होईल. या विचाराने जोतीबांनी मुलींसाठी शाळा स्थापन केल्या, प्रौढांसाठी रात्रीचे वर्ग काढले. पाच हजार वर्षाच्या भारताच्या इतिहासात मुलींसाठी शाळा स्थापन करणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा फुले हे भारतीय स्त्री-शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात.
१८४८ साली जोतीबांनी पुण्यातील बुधवार पेठेत पहिली मुलींची शाळा काढली. १८५१ साली रास्ता पेठेत मुलींची दुसरी तर १८५२ साली मुलींची तिसरी शाळा सुरू केली. मुलींना शिकविण्यासाठी स्त्री-शिक्षका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईना तयार केले. स्त्री-शिक्षणाला अनुकूल नसलेल्या समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. सावित्रीबाईंचा या शाळेत जाता-येता छळ झाला. तसेच जोतीरावांच्या वडिलांनी जोतीरावांना व सावित्रीबाईना घराबाहेर काढले.
१८६० साली महात्मा फुले यांनी सामाजिक सुधारणेचे आणखी एक पाऊल टाकले. विधवा केशवपनास विरोध आणि त्यांचा पुनर्विवाह ही ती सुधारणा होय. १८६० व १८६४ साली जोतीरावांनी शेणवी विधवेचा विवाह लावला. तसेच १८६३ साली त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृह काढले. दलितांना पाणी भरण्यासाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. ब्राह्मण म्हणजे भूदेव ही त्या काळातील सामान्य माणसाची श्रद्धा होती. मुलाच्या जन्मापासून त्याच्या निधनानंतर त्याच्या दहाव्यापर्यत ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागत असे. त्याशिवाय माणसाला मोक्ष मिळणार नाही अशी त्या काळात ठाम समजूत होती. या ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आणि मानसिक गुलामगिरीविरुद्ध 'ब्र' काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती या काळात जोतीबांनी समाजक्रांतीचे निशाण फडकवले.
१८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. विद्या, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. हजारो अनुयायी घडवले. डॉ. किर व डॉ. मालशे यांगी ‘महात्मा फुले-समग्र वाङ्मय’ या ग्रंथात म्हटले आहे की, “ही चळवळ म्हणजे खेडुतांना शिक्षण नि ज्ञान देऊन त्यांच्या ठायी बसत असलेली अज्ञानादि पूर्वग्रहांची जळमटे झटकून टाकून आधुनिक संस्कृतीचे आणि ज्ञानाचे लोण त्यांच्यापर्यंत पोहोचविणारी एक सामाजिक प्रबोधिनी होती.” पारंपरिक धार्मिक गुलामगिरीतून समाजाला मानसिक मुक्ती मिळवून देण्याचे कार्य या संस्थेतर्फे केले गेले.
महात्मा फुले यांनी १८५५ ते १८९० या काळात ‘तृतीय रत्न’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘सत्सार-२’, ‘सत्सार-१’, ‘अस्पृश्यांची कैफियत’ व ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ही पुस्तके लिहिली. आपले क्रांतिकारी विचार त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून पददलितांपर्यत पोहोचविले. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काही विधायक उपायही सुचवले आहेत. शंभर वर्षापूर्वीचे हे मौलिक विचार आजही लागू पडतात. यावरून जोतीरावांचे अलौकिक द्रष्टेपण दिसून येते.
लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात त्याप्रमाणे “हे विचार भारतातील लोकशाहीच्या क्रांतीच्या अग्रदूताचे विचार होत. सर्व मानवांचे जे जीवन व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता यांनी भरलेले आहे ते सामाजिक जीवन हेच पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य होय.”
अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर जोतीराव झगडत राहिले. विद्या, सत्य व सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले. अशा या थोर समाजसुधारकाची प्राणज्योत २८ नोव्हेंबर, १८९० जी मावळली. सामाजिक न्याय, बंधुभाव, सामाजिक समता या शाश्वत मूल्यांची देणगी समाजाला देऊन हा महापुरुष काळाच्या पडद्याआड गेला. जोतीराव गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.