Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
मी रेडिओ बोलतोय
Solution
मी रेडिओ बोलतोय
“नमस्कार मंडळी, ओळखलत का मला? हे काय? तुमच्या चेहऱ्यावर चक्क प्रश्नचिन्ह दिसतय. म्हणजे ओळखलं नाहीत तर! काय म्हणताय, आवाज ओळखीचा वाटतोय. अहो नुसतं ओळखीचा वाटतोय असं काय म्हणताय, आठवा बरं जरा कोणाचा आवाज आहे ते. साधारण पंचवीस वर्षापूर्वी सकाळच्या मंगलवेळी माझे गोड सूर घराघरातून ऐकू यायचे. तसेच व्हायोलीनची सुंदर धून ऐकुनच नवीन आशांनी भरलेला तुमचा नवा दिवस सुरू व्हायचा आणि ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना घेऊन, रात्री आपल्या आवडीची मधुर गीते ऐकत ऐकतच तुम्ही निद्रादेवीच्या अधीन होत होता. ‘आपली आवड' म्हटल्यावर आता तर नक्कीच तुम्ही ओळखलं असेल मी कोण हे! माझ्यावरून प्रसारित होणाऱ्या सुमधुर हिंदी-मराठी गाण्यांनी ज्यांचे तारुण्याचे दिवस मंत्रमुग्ध झाले त्या बुजुर्ग मंडळींना तर माझी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.”
आँ? काय म्हणालात? हो हो तोच मी. अगदी बरोबर ओळखलत मला. आहे मीच तो तुमचा एकेकाळचा सखा रेडिओ! आजकाल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझा विसर पडला आहे. दूरचित्रवाणीचे आगमन झाले अन् तुम्ही सर्व जण त्याचा झगमगाटात इतके गुंतून गेलात की एकेकाळच्या तुमच्या सख्याचा आवाजही तुम्हाला ओळखू येईना! जाऊ द्या, कालाय तस्मै नम: पण मी तुम्हाला सांगतो की, माझे कार्यक्रम अधिक जोमाने सुरू आहेत. त्यांची व्याप्ती आणि विषयांचे वैविध्यही वाढले आहे. माझा आवाज लहरींच्या रूपाने हवेतून तुमच्यापर्यंत येतो. म्हणून तुम्ही मला आकाशवाणी, नभोवाणी असे संबोधता आणि माझे ब्रीदवाक्य आहे, ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’, समाजशिक्षण, समाजप्रबोधन, समाजाची वैचारिक, सांस्कृतिक उन्नती हेच माझ्या कार्यक्रमांमागचे मुख्य प्रयोजन आहे.
तुम्हाला ठाऊक आहे का? भारताच्या स्वातंत्रयलढ्यात मी केवढी मोठी कामगिरी केली आहे. सन् १९४२ च्या ‘चले जाव’ लढ्याच्यावेळी अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले होते व त्यांनी स्वत:चे नभोवाणी केंद्र चालवले होते. नेताजी सुभाषचंद्रांनी ‘चलो दिल्ली’ चा संदेश जनतेलामाझ्याच माध्यमातून दिला.
तुम्ही शहरातले लोक मला विसरत चाललाय याचा खेद वाटतोय खरा. पण आशेचा किरण अजूनही आहे तो ग्रामीण भागात. शेतावरून दमून-भागून आलेले शेतकरी दादा जेव्हा भजन, कीर्तन असे माझे कार्यक्रम ऐकण्यात रंगून जातात व त्यामुळे त्यांचे श्रम हलके होतात तेव्हा मला मनापासून आनंद होतो. रानावनात एकटाच हिंडणारा गुराखी सुमधुर गीते, बातम्या, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकतो तेव्हा त्याचे या विश्वासी चटकन नाते जोडले जाते. तेव्हा मला समाधान होते.
कृषिप्रधान भारतीय समाजातील ग्रामीण जनतेशी अनेकविध उपयुक्त कार्यक्रमांद्वारा आकाशवाणी संपर्क राखते. चालू जमाना, माझं घर, माझं शेत, कृषिसल्ला, शेतीतील नवीन प्रयोगांची माहिती अशा अनेकविध कार्यक्रमांमुळे आकाशवाणीची ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधीच तुटली नाही. बालसंगोपन, आरोग्य शिक्षण याविषयीची जी थोडीफार जागृती ग्रामीण व आदिवासी भागात होत आहे ती आकाशवाणीवरील कार्यक्रमांमुळेच होय.
आकाशवाणी आणि संगीत यांचं नातं तर अतूट असं आहे. रेडिओवरील संगीताचे कार्यक्रम सामान्यांना चटकन आपलेसे करतात तर गानरसिक श्रोत्यांना आणि कलावंतांना आनंदाच्या खजिन्याची गुहाच उघडून देतात. आकाशवाणीच्या संग्रहातील अवीट गोडीची जुनी गाणी, शास्त्रीय संगीत तसेच वाद्यसंगीत म्हणजे आपल्या गानसंस्कृतीचा अमोल अक्षय असा ठेवाच!
महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या साजाने अजरामर झालेले गीतरामायण सर्वप्रथम प्रसारित झाले ते रेडिओवरूनच! त्यावेळेला गीतरामायणाचा कार्यक्रम सुरू होण्याआधी लोक मला हार घालून माझीच भक्तिभावाने पूजा करत असत.
उत्तमोत्तम साहित्यकृतींची नाट्यरूपांतरे सादर करून मी सर्वसामान्यांना वाङ्मयाभिमुख बनवतो तर साहित्य रसिकांना भरभरून आनंद देतो. महिलांच्या भावविश्वाचा, साहित्यउर्मीचा, कर्तृत्वाचा तसेच प्रगतीच्या नव्या वाटांचा शोध महिलांच्या कार्यक्रमात घेऊन महिलांच्या मनात आकाशवाणीने हक्काचे घर प्रस्थापित केले.
खऱ्या अर्थाने समृद्ध सहजीवन कसे जगावे हे सांगताना पती-पत्नीमधील समृद्ध सहजीवन, पालक आणि मुलं यांच्यातला सुसंवाद, भावी जोडीदाराबद्दलच्या नवीन पिढीच्या उचित अशा अपेक्षा यासारख्या विषयांवर तज्ज्ञांच्या चर्चा माझ्या कार्यक्रमातून होतात. त्या खरोखरच मार्गदर्शक असल्याचा अभिप्राय श्रोत्यांकडून मिळाल्यावर मला संतोष होतो, घटस्फोट, बालगुन्हेगारी, कैद्यांचे मानसशास्त्र अशांसारख्या मानसशास्त्रीय आणि सामाजिक प्रश्नांवरचेही तज्ज्ञांचे विचारमंथ श्रोत्यांना उपयुक्त ठरते. मुला-मुलींना वाढविताना भेद करू नये, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्याच्या दिशेने प्रयत्नशील राहिले पाहिजे हा महत्त्वाचा विचार तर माझ्या अनेक कार्यक्रमांतून जनमानसात सातत्याने रुजवण्याचा प्रयत्न होतो.
लोकाभिमुखता हे माझ्या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्यच आहे. गण, गवळण, भारूड, धनगरी ओव्या गाणारे गायक, पारंपरिक वाद्य वाजवणारे वादक यांच्या लोकसंगीताचा मनोरम आविष्कार माझ्या कार्यक्रमातून होतो. सामान्यांच्या असामान्य कलेची, त्यांच्या मतांची तसेच त्यांच्या प्रश्नांची दखल माझ्या कार्यक्रमातून घेतली जाते. तेव्हा माझं ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य सार्थ झाल्याचं समाधान मला वाटतं.
तुमच्या कार्यक्रमात बाधा न आणता तुमचं मनोरंजन,उद्बोधन करण्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता माझ्यात आहे. तुमचा एकटेपणा दूर करण्याची जादू माझ्यात आहे. तुम्ही तुमच्या मित्राशी जसे हितगुज करता अगदी त्याप्रमाणेच मी तुमच्याशी हितगुज करतो आणि मी तुमच्याबरोबर कुठेही येऊ शकतो. हा आणखी एक फायदा.
कार्यक्रमात कोणताही भडकपणा, अतिरंजितपणा ने आणता प्रेम, दया, करुणा, सहकार्य अशा मानवी मूल्यांचे संस्कार करणे, हेच तर माझे उद्दिष्ट आहे आणि यासाठी मला तुमची निरंतर साथ हवी आहे. द्याल ना मला साथ?