Advertisements
Advertisements
Question
खालील विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
Solution
समुद्रकिनाऱ्यावरील संध्याकाळ
समुद्रकाठच्या गावांचा मला नेहमीच हेवा वाटतो. तिथल्या लोकांना संध्याकाळी काय करायचं? हा प्रश्न केव्हाच पडत नाही. कारण उत्तर तयार असतं समुद्रावर जायचं. चित्रपटगृह, नाट्यगृह आणि संग्रहालय या साऱ्यांची उणीव एकटा समुद्र भरून काढतो. बरे! काल समुद्रावर गेलो म्हणून आज नको, असं कुणीही म्हणत नाही. उलट सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ गेलो तरी कंटाळा येत नाही. तेही सौंदर्य पार्ववीच्या रूपाप्रमाणे नित्यनूतन असते. म्हणूनच सुट्टीत मी नेहमी फिरण्यासाठी समुद्रकिनारी जातो. अशाच एका सुट्टीत मी रत्नागिरीला गेले होते. दिवसाची उन्हं ओसरली आणि पाय आपोआप समुद्राकडे वळले. समुद्रकिनाऱ्यावर नेहमीची दृश्य दिसत होती. कुठे लहान मुलं वाळूचे किल्ले करत होती. ते पुनःपुन्हा मोडत होती, उभे करत होती. लांबवर पाण्यात डचमळणाऱ्या होड्या दिसत होत्या. प्रत्येक लाटेबरोबर वाळूत रुतून बसलेले शंख-शिंपले काढण्याची मुलांची धडपड सुरू होती. भेळवाले, फुगेवाले आणि शहाळी विकणारे यांची एकच गर्दी उसळली होती. आता संध्याकाळ होऊ लागली होती. आकाशात रंगांची मुक्त उधळण झाली होती. सूर्याची सोनेरी किरणं पाण्यावर चमकत होती. हवेत वाऱ्याचा गारवा आणि उन्हाचा उबदारपणाही होता. समुद्राच्या लाटा एका लयीत संथपणे येऊन किनाऱ्यावर आदळत होत्या. समुद्रबगळ्यांचे थवे पाण्यावरून उडत होते. माणसांची गर्दी खूप होती. पण सारं स्तब्ध होतं. सर्वाचे लक्ष होते लालभडक सूर्याकडे. काही मिनिटांतच ते दृष्टिआड होणार होतं. त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं होतं. आजूबाजूच्या ढगांना आणि पाण्याला त्याने झळझळीत केलं होतं. घड्याळाच्या काट्याबरोबर त्या तेजात बदल होत होता. रंग मंदावत होता. आता त्याच्याकडे नजर रोखून पाहिले तरी त्रास होत नव्हता. किनाऱ्यावरची माणसंही थोडी अस्पष्ट दिसायला लागली होती. सूर्याचा लहानसा ठिपकाहीं ढगाआड झाला आणि क्षितिजरेखा काळवंडू लागल्या. हवेत गारवा निर्माण झाला. किनाऱ्यावरचे सगळे लोक सूर्यास्ताचे दृश्य पाहून भारावून गेले.
सूर्यास्त झाला तरी लाटांचं नर्तन सुरूच होतं. ते तसंच अव्याहतपणे सुरू राहणार होतं. आता त्यांचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होतं. कारण रंगांची आणि प्रकाशाची नजरबंदी संपली होती. वातावरण गूढ, थोडं उदास झालं होतं. दिवसभर दिमाखाने तळपणारा आणि आता अस्ताला जाणारा सूर्य जीवनाचा नवीनच अर्थ उलगडून सांगत होता.
समुद्राची अथांगता, विस्तार, त्याचं सर्व काही भलंबुरं पोटात साठवून ठेवणारं रूप मला चकित करीत होतं. त्याची भव्यता आणि माणसाचा खुजेपणा यातला विरोध जाणवत होता. दिमाखाने येणारी लाट किनाऱ्या येऊन फुटत होती.
“हळूहळू खळबळ करीत लाट
येऊनी पुळणीवर ओसरती
जणू जगाची जीवनस्वप्ने
स्फुरती, फुलती, फुटती, विरती”
प्रत्येक लाटेचं उत्साहात येणं आणि संपून जाणं मानवी स्वप्नाचचं वास्तव सांगत होती किंवा एखाद्या ध्येयवेडया माणसाची आपल्या ध्येयामागची तळमळ दाखवित होती. सभोवताली काळोख पसरू लागला तरी समुद्राची गाज ऐकू येत होती. ती तशीच अखंड सुरू राहणार होती.
सगळ्या नद्या, नाले, ओहोळ पोटात साठविणारा आणि थकल्याभागल्या जीवांना आश्रय देणारा हा पयोधि त्या संध्याकाळी मला आईसारखा स्नेहशील वाटला, सारं दुःख पचवून आनंदानं जगण्याची कला त्याच्याकडूनच शिकली पाहिजे.
“कळे मला का म्हणती तुजला
रत्नाकर, तीर्थांचे आगर,
शिकव जगाचे दुःख गिळुनिया
फळाफुलांनी भरण्या डोंगर”
स्वामी विवेकानंदांनाही कन्याकुमारीच्या तीन समुद्राच्या सान्निध्यात ध्यानाला बसावं, असं का वाटलं याच रहस्य मला त्या समुद्राच्या रूपाने उलगडलं. विचारांच्या कल्लोळात किती वेळ गेला कोणास ठाऊक? किनाऱ्यावरची वर्दळ आता खूपच कमी झाली होती. माणसांचे ठिपके विरळ झाले होते. उठावंसं वाटत नव्हतं, पण उठणं आवश्यक होतं. वियोगाची हुरहुर मनात ठेवूनच मी सागराचा निरोप घेतला.