Advertisements
Advertisements
Question
कृत्रिम उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे करतात?
Solution
कृत्रिम उपग्रहांच्या कार्यानुसार त्यावर विविध उपकरणे बसवलेली असतात. कार्यानुसार उपग्रहांचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात :
(१) हवामान उपग्रह : हे उपग्रह हवामानविषयक सर्व बाबींचा सतत आढावा घेतात. तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता, ढगांची स्थिती अशा विविध गोष्टींची माहिती मिळवून हे कृत्रिम उपग्रह ती माहिती पृथ्वीकडे पाठवतात. या माहितीचा उपयोग करून हवामानाचा अंदाज व्यक्त केला जातो.
(२) दळणवळण उपग्रह : जगाच्या कोणत्याही भागाशी त्वरित संपर्क साधण्यासाठी आज दूरध्वनी, मोबाइल व संगणकीय दळणवळण ही साधने वापरली जातात. हे दळणवळण अवकाशातील अनेक कृत्रिम उपग्रह एकत्रितरीत्या सुलभतेने घडवून आणतात. त्यामुळेच जगात आता आपण कोणाशीही कधीही संपर्क साधू शकतो व छायाचित्रे, ध्वनिफिती आणि ई-मेल क्षणार्धात पाठवू शकतो.
(३) ध्वनी-चित्र प्रक्षेपक उपग्रह : हे उपग्रह आकाशवाणी व दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रत्यक्ष त्याच क्षणी (Live) प्रसारित करण्याचे कार्य करतात. त्यामुळे जगभरातील घडामोडी, कार्यक्रम, घटना, क्रीडा सामने प्रत्यक्ष त्याच क्षणी घरबसल्या पाहता येतात. तसेच माहितीचे, बातम्यांचे जलदरीत्या आदान-प्रदान होते.
(४) दिशादर्शक उपग्रह : हे कृत्रिम उपग्रह भू-जल - वायू वाहतुकीचे नियंत्रण व सुसंचालनासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हे उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक स्थानाचे अक्षांश व रेखांश अचूकपणे निश्चित करतात. मोबाइलमधील नकाशे आणि रस्ता दाखवण्याचे नकाशे या दिशादर्शक उपग्रहांमुळेच कार्य करतात.
(५) सैनिकी उपग्रह : संरक्षण किंवा लष्करी दृष्टिकोनातून पृथ्वीवरील विविध ठिकाणांची माहिती मिळवणे, विशेषत: सीमारेषां वरील शत्रूच्या हालचालींचे सतत निरीक्षण करणे, क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणे, आपल्या क्षेपणास्त्रांना दिशा दाखवणे इत्यादी विविध कार्ये हे उपग्रह करतात.
(६) पृथ्वी-निरीक्षक उपग्रह : पृथ्वीची अद्ययावत (Real time) माहिती नियमितपणे मिळवणे, सर्वांगी निरीक्षण करीत राहणे, माहितीचे संकलन व त्याआधारे साधनसंपत्तीचा शोध आणि व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या घटनांचे सतत निरीक्षण व त्यामधील बदलांचा वेध घेणे इत्यादी अनेक कार्य हे उपग्रह करतात.
(७) अन्य कार्ये : या कार्यांव्यतिरिक्त काही विशिष्ट कार्यांसाठी उपग्रह पाठवले जातात. ज्यात शैक्षणिक उपग्रह [उदा., भारताचा (EDUSAT)], नकाशे बनवणारा [उदा., भारताचा (CARTOSAT)] दुर्बीण [(उदा., हबल)], मानवाला अवकाशात संशोधनासाठी अल्प ते दीर्घकालीन वास्तव्य करू देणारा उपग्रह (उदा., अवकाशस्थानक) यांचा समावेश होतो.
वरील विविध कार्यांवरून उपग्रहांचे महत्त्व लक्षात येते.