Advertisements
Advertisements
प्रश्न
भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा.
उत्तर
प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरण या उपशाखांशी संबंधित आहे. त्यामुळे हा अभ्यास करतानाच खनिजे, खडकांची निर्मिती, भूस्तर, हवेचे घटक, वातावरणाची रचना, उष्णतेचे वहन, हवेचा दाब, जलचक्र, तापमान वितरण, पर्जन्याचे वितरण, वायुराशी, वारे, अन्नसाखळी व अन्नजाळे, ऊर्जा चक्र, मृदा निर्मिती, सूक्ष्मजीव विघटन चक्र अशा विविध ज्ञानशाखांचा विचारही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना करावा लागला. यामुळेच प्राकृतिक भूगोलाच्या भूमिती, बीजगणित, जीवशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विविध विषयांशी संपर्क येऊन भूगोलाच्या अभ्यासकांनी या सर्व ज्ञानशाखांचा स्वीकार करून भूगोलाच्या इतर ज्ञानशाखांचा विकास केला. त्यामुळे भूगोलत आता खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण शास्त्र अशा महत्त्वाच्या ज्ञानशाखांचा विकास झाला.
मानवी भूगोलाच्या अभ्यासात अशाच प्रकारे मानवी जीवन, मानवी वस्ती, मानवाच्या विविध आर्थिक क्रिया, लोकसंख्या, जन्मदर व मृत्युदर वितरण, घनता, समाज, सांस्कृतिक उत्क्रांती हे टप्पे दिसून येतात. या ज्ञानशाखांचा अभ्यास करताना भूगोल अभ्यासकांनी इतिहास, प्रागैतिहास, समाज, विज्ञान, ग्रंथालय शास्त्र, अर्थशास्त्र, मानवाशी संबंधित असलेल्या अशा विविध ज्ञानशाखांचा समावेश आपल्या अभ्यासात करून त्यातूनच आर्थिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, वस्ती भूगोल, शहरी भूगोल अशा ज्ञानशाखांचा विकास झाला.
थोडक्यात, मानवाने भूगोलाचा अभ्यास करताना उपलब्ध सर्व ज्ञानशाखांचा वापर करून भूगोलाच्या सर्व ज्ञानशाखांचा विकास घडवून आणला.