Advertisements
Advertisements
प्रश्न
प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे?
उत्तर
प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ आहे. त्यातील असेंद्रिय घटक निसर्गाकडे पुन्हा जाण्यासाठी खूपच वर्षे लागतात. शेकडो वर्षे प्लास्टिक तसेच पडून राहते. त्यामुळे प्लास्टिकने धन कचरा प्रदूषण होते. प्लास्टिक जाळल्यास विषारी वायूने हवा प्रदूषण होते. विशेषतः ज्या वेळी प्लास्टिक कसेही आणि कोठेही फेकले जाते, तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. जर प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू भूमिभरण क्षेत्रात टाकल्या तर तेथे होणाऱ्या विघटन-प्रक्रियांवर विपरीत परिणाम होतो. जर या वस्तू पाण्यात टाकल्या तर तेथील जलचरांना हानी पोहोचू शकते. विशेषतः प्लास्टिक पिशव्यांचा वापर अतिशय हलगर्जीपणे आणि खूप जास्त प्रमाणात केला जातो. गाईगुरांच्या पोटात प्लास्टिक जाऊन ती मृत्युमुखी पडतात. पावसाच्या काळात गटारे प्लास्टिकच्या पिशव्यांनी तुंबून शहरे जलमय होतात. मासेमारी करण्याच्या मच्छिमारांच्या जाळ्यात आता निम्म्याहून जास्त प्लास्टिकच्या पिशव्याच येतात हे सत्य आहे. जोपर्यंत लोक आपली मानसिकता बदलत नाहीत तोवर हे प्लास्टिकचे दुष्परिणाम संपूर्ण पर्यावरणालाच सोसावे लागतात.
कापडी पिशव्या हा प्लास्टिकच्या पिशव्यांना चांगला पर्याय आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास प्लास्टिक पिशवीवर बंदी येणे योग्यच आहे व गरजेचेही आहे.