Advertisements
Advertisements
प्रश्न
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर
"आरशातली स्त्री" या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या आताच्या अस्तित्वातील वेदना आणि तिच्या भूतकाळातील अस्मिता यांच्यातील विरोधाभास प्रभावीपणे शब्दबद्ध केला आहे. आरशातील स्त्री, आरशाबाहेरील स्त्रीला भूतकाळाची जाणीव करून देते आणि सांगते की ती आता पूर्णतः बदलून गेली आहे.
पूर्वी ती सर्वत्र बहर पसरवणारी नवयौवना होती, आनंदाने भरलेली होती. मात्र, आता ती संसारात अडकून, मूक आणि सहनशील झाली आहे. तिच्या आयुष्यातील प्रिय, चांदण्यासारख्या आठवणी तिच्या अंगणात तिष्ठत आहेत, पण त्यांना कवटाळण्याचेही भान तिला राहिलेले नाही. कधीकाळी ती बागेत अल्लडपणे बागडायची, पण आता तिची वाट पाहून जुईसुद्धा पेंगुळली आहे.
आरशातील स्त्री तिच्यातील हा बदल स्पष्टपणे दाखवते – ती आतून-बाहेरून बदलली आहे. तिच्या स्त्रीत्वाच्या नैसर्गिक भावना दडपल्या गेल्या आहेत. ती आता अस्तित्वहीन, आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहे. "वाट पाहणारे प्रेयस चांदणे" आणि "पेंगुळलेली अल्लड जुई" या प्रतिमांमधून तिच्या भूतकाळातील भावभावना मांडल्या आहेत, तर "अस्तित्वहीन, प्राण हरवलेली कठोर पुतळी" या प्रतिमेतून तिच्या आताच्या मूकवेदनांचे चित्रण प्रभावीपणे केले आहे.