मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणते?

थोडक्यात उत्तर

उत्तर

ज्या प्रदेशात मानवी वस्तीला अनुकूल परिस्थिती असते अशा प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते, याउलट ज्या प्रदेशात मानवी वस्तीला फारशी अनुकूल परिस्थिती नसते अशा प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. लोकसंख्येचे असमान वितरण कोणत्याही एका घटकामुळे होत नसते, तर ते अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे घडून येत असते.
जगातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे आहेत:

 (१) प्राकृतिक रचना किंवा भूरूपे: सपाट प्रदेश शेतीला अत्यंत उपयुक्त ठरतो. तेथे शेतीसाठी कालवे काढणे, रस्ते तयार करणे, लोहमार्ग बांधणे, कालव्यातून जलमार्ग तयार करणे सोपे जाते; म्हणून सपाट मैदानी प्रदेशात शेती व कारखाने विकसित होतात. त्यामुळे सपाट मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती असते. म्हणूनच नाईल, मिसिसिपी, यांगत्से, तसेच भारतातील गंगेच्या मैदानात दाट लोकवस्ती आहे.
पर्वतीय प्रदेशात तीव्र उतार असतो. अशा प्रदेशातील काही निवडक जागी पाण्याची उपलब्धता असते, त्यामुळे तेथे लोकवस्ती आढळते. तीव्र उतारामुळे डोंगराळ पर्वतीय प्रदेश शेतीच्या व्यवसायात फारसा उपयुक्त ठरत नाही. तेथे शिकार, लाकूडतोड, शेळ्या-मेंढ्या पाळणे यांसारखे प्राथमिक व्यवसाय अगदी मर्यादित स्वरूपात चालतात. तसेच तेथील थंड हवामान मानवाला प्रतिकूल असते म्हणून तेथे लोकसंख्या कमी आढळते.
थोडक्यात, प्राकृतिक रचनेचा विचार करता, सपाट मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त, तर तीव्र उताराच्या डोंगराळ पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते.
(२) हवामान: हवामानाचा परिणाम विशेषकरून लोकसंख्येच्या घनतेवर होतो. अतिशय प्रतिकूल हवामान असलेले अतिउष्ण, अतिथंड, अति पावसाचे किंवा अति कोरड्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते. कारण असे प्रदेश लोकवस्तीस अनुकूल नसतात. उदा., सैबेरिया, अंटार्क्टिका यांसारख्या अतिथंड हवामान असलेल्या प्रदेशात लोकवस्ती आढळत नाही किंवा अतिशय विरळ प्रमाणात आढळते. सहारा, कलहारी यांसारख्या कोरड्या आणि अतिउष्ण वाळवंटी प्रदेशातही विरळ लोकवस्ती आढळते. तसेच उष्ण व दमट हवामान असलेल्या विषुववृत्तीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. याउलट जेथे ऋतुमानाप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही अशा सम आणि उबदार हवामान असलेल्या समशीतोष्ण प्रदेशात, तसेच मान्सून हवामानाच्या प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते.
(३) पाण्याची उपलब्धता: मानवी वसाहत निर्माण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजे पाणी होय. मानव, प्राणी व वनस्पती हे पाण्यावाचून जगू शकत नाहीत. तसेच मानवाला घरगुती वापरासाठी, शेतीसाठी, पशुपालनासाठी व कारखान्यांसाठी पाणी अत्यंत आवश्यक असते. थोडक्यात, जेथे पुरेसा व नियमित पाणीपुरवठा असतो अशा प्रदेशात दाट लोकवस्ती असते. नद्यांची खोरे, तसेच किनारपट्टी प्रदेश, नद्यांचा मैदानी प्रदेश येथे दाट लोकवस्ती आढळून येते. उदा., नाईल नदीचे खोरे. भारतीय किनारपट्टीचा प्रदेश, तसेच भारतीय गंगा, यमुना नदीचा प्रदेश, वाळवंटातही मरूदयान परिसरात किंवा हिरवळीच्या प्रदेशात जेथे पाणी उपलब्ध असते तेथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळून येते.
(४) मृदा: मानवाची अन्नाची प्राथमिक गरज ही प्रामुख्याने शेती उत्पादनातून भागवली जाते आणि शेती ही मुख्यतः मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते. नदयांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होते. म्हणूनच ईजिप्तमधील नाईल, भारतातील गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रेच्या सुपीक प्रदेशांत, तसेच मिसिसिपी, यांगत्से या नद्यांची पूरमैदाने येथे लोकसंख्या अतिशय दाटीने केंद्रित झालेली आढळून येते. यांशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेश, तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेल्या मृदेत संपन्न शेती होते; म्हणून अशी मृदा असलेले इंडोनेशियातील जावा बेट, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार व पायथ्याचे प्रदेश येथे लोकसंख्या केंद्रित झालेली दिसून येते.
(५) खनिजसंपत्ती किंवा भूगर्भ रचना: पृथ्वीच्या भूकवचा मधील खडकात मानवाला उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात. ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते. जगाच्या काही भागात अन्य भौगोलिक घटक प्रतिकूल असूनही केवळ खनिज संपत्ती मुळे तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसते. ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश आणि मध्यपूर्व आशियातील खनिज तेल संपन्न देश ही याची उत्तम उदाहरणे आहेत.
(६) नैसर्गिक वने : अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. विषुववृत्तीय वने अतिशय दाट असल्यामुळे तेथे अत्यंत विरळ लोकवस्ती आढळते. उदा., ॲमेझॉनचे खोरे, काँगो नदीचे खोरे येथील विषुववृत्तीय सदाहरित वनांचा प्रदेश.
(७) प्रदेशाची सुगमता : ज्या प्रदेशात माणसाला सहजासहजी ये-जा करणे शक्य असते अशा सपाट, मैदानी व किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या अधिक असते. याउलट ज्या प्रदेशात ये-जा करणे कठीण असते अशा डोंगराळ व दुर्गम प्रदेशात लोकवस्ती कमी असते.
(८) प्रदेशाचे सापेक्ष स्थान : लोकसंख्या वितरणावर त्या क्षेत्राचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटांवर असतात, काही प्रदेशांना द्वीपकल्पीय स्थान असते, तर काही देश हे पूर्णतः खंडांतर्गत असतात, याचाही परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय संगीत प्राप्त होते. साहजिकच तेथे लोकसंख्येचे केंद्रीकरण आढळते. उदा., इंग्लंड, जपान व काही द्वीपकल्पीय देशांनाही साधारण अशाच स्वरूपाचे लाभ असल्यामुळे तेथे जास्त लोकसंख्या दिसून येते. उदा., भारत, दक्षिण कोरिया, बांगला देश इत्यादी. याउलट अफगाणिस्तान, नेपाळ अशा खंडांतर्गत प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते.

shaalaa.com
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - प्राकृतिक घटक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ४. १) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×