Advertisements
Advertisements
प्रश्न
विपणनाची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
- बाजारपेठ संशोधन: बाजारातील ग्राहकांच्या इच्छा व गरजा जाणून घेण्यासाठी जेव्हा व्यवसाय पुढाकार घेतो. तेव्हाच विपणन परिणामकारक होत आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी, ग्राहकांच्याकडून माहिती गोळा करणे आणि तिचे विश्लेषण करणे म्हणजे बाजारपेठ संशोधन होय. माहितीचे विश्लेषण केल्यामुळे बाजाराच्या गरजेचे आकलन होते. केव्हा खरेदी करावयाचे आहे? किती प्रमाणत खरेदी करावयाचे आहे? आणि कोणत्या किमतीला खरेदी करावयाचे आहे? हे जाणून घेण्यास मदत होते. वस्तूंच्या यशस्वी विपणनाबाबत विविध निर्णय घेण्यासाठी बाजारपेठ संशोधनाची मदत होते.
- मालाची खरेदी व एकत्रीकरण: उत्पादन करण्यासाठी विविध ठिकाणी उपलब्ध असणारा कच्चा माल संकलित करण्याचा यात समावेश होतो. हे कार्य महत्त्वाचे आहे कारण कच्च्या मालाची गुणवत्ता व किंमत यावर उत्पादित मालाची गुणवत्ता अवलंबून असते. उत्पादन करणाऱ्या संस्थांना याची गरज असते.
- बाजारपेठेचे नियोजन: विपणनाच्या गरजेचे आकलन झाल्यानंतर, व्यवसायाला, निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी विपणनाचे नियोजन व व्यूहरचना तयार करावी लागते. बाजारपेठेचे नियोजन ही एक प्रक्रिया आहे की जी व्यवसायाच्या विपणनाची उद्दिष्टे ठरविते व ती साध्य करण्यासाठी व्यूहरचना बनविते. हा एक सर्वसमावेशक नकाशा असतो की ज्याचा उपयोग व्यवसायाच्या संपूर्ण विपणन प्रयत्नांची रूपरेषा ठरविताना होतो.
- उत्पादन विकास: वस्तूच्या विक्रीमध्ये वस्तू विकासाचा आराखडा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादन विकास करणे गरजेचे असते. वस्तूचा दर्जा, प्रमाण, आकार, बांधणी, रंग इ. बाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा समावेश वस्तू आराखडया मध्ये असला पाहिजे. ग्राहकांची पसंती ही नेहमीच चांगल्या व आकर्षक वस्तूची असते. वस्तूची आकर्षक रचना व्यवसायाला स्पर्धात्मक लाभ मिळवून देते. ग्राहकांच्या गरजांमध्ये वारंवार बदल होत असल्यानेच उत्पादन विस्तार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
- प्रमाणीकरण व प्रतवारी: वस्तूंवरील प्रक्रियाचा आकार, दर्जा, रचना वजन, रंग इ. बाबत प्रमाण ठरविण्याच्या प्रक्रियेस प्रमाणीकरण असे म्हणतात. वस्तूंच्या दर्जामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी याची मदत होते. तसेच ग्राहकाची वस्तूविषयी निष्टा निर्माण होण्यासाठी सुध्दा याची मदत होते. वस्तूच्या अंगी असणाऱ्या एकसारख्या गुणवैशिष्ट्याच्या व दर्जाच्या आधारे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला प्रतवारी असे म्हणतात. वस्तूंचा आकार, आकारमान, दर्जा इ. वैशिष्ट्यांच्या आधारे प्रतवारी केली जाते. सर्वसाधारणपणे गहू, तांदूळ, बटाटा इ. प्रकारच्या कृषी मालाची प्रतवारी केली जाते.
- परिवेष्टन/संवेष्टन व लेबलिंग: पॅकेजिंग शब्द जास्त परिचित आहे. बांधणी व संवेष्टन यामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी प्रथमत:च चांगला ठसा निर्माण होतो. आकर्षक बांधणी व संवेष्टन यामुळे उत्पादन यशस्वी होण्यास मदत होते. परिवेष्टनाचा उपयोग उत्पादनाची मोडतोड, नुकसान आणि हानी रोखण्यासाठी होतो. बांधणीच्या साहित्यामध्ये बाटली, बरणी (कंटेनर) प्लास्टिकच्या पिशव्या, बंद डबे, लाकडी पेट्या, गोणपाटाची पोती, फोम व बबल बॅग्स इ. समावेश होतो.वस्तूंवर लावलेले लेबल ही अशी एक खुणेची चिट्टी असते की, जी उत्पादन व उत्पादकाविषयी सविस्तर माहिती पुरविते. अशी माहिती पुरविणारी जी खूण असते तिला लेबल व त्यासाठीची जी प्रक्रिया चालते तिला लेबलिंग असे म्हणतात. पॅकेजिंग व लेबलिंग ही फक्त वस्तूला सुरक्षित ठेवतात असे नाही तर विपणनाचे एक प्रभावी शस्त्र म्हणून कार्य करतात.
- मुद्रीकरण: प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या उत्पादनाची बाजारात स्वतंत्र ओळख असली पाहिजे असे वाटते. मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे की, जी बोधचिन्हाचा वापर करून आपल्या उत्पादनाला स्पर्धकाच्या उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. नोंदणीकृत मुद्रेलाच व्यापारी चिन्ह असे म्हणतात. त्यामुळे नवीन व्यवसाय मिळण्यास व बाजारात आपल्या उत्पादनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाची कॉपी करता येत नाही किंवा त्याचा दुसऱ्यांनाही वापर करता येत नाही.
- ग्राहक सहाय्यक सेवा: ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे त्यामुळे व्यवसायाला ग्राहकांच्या समाधानासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. व्यवसायाने, ग्राहकांची सहाय्यक सेवा पुरविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचे असते. योग्य वेळी सेवा पुरविल्याने ग्राहकांची निष्ठा वाढते. व्यवसाय ग्राहकांना पुढील विक्रयोत्तर सहाय्यक सेवा पुरवू शकतात जसे की, विक्री पूर्व सेवा, ग्राहक मदत सेवा केंद्र (हेल्पलाईन), विक्रयोत्तर सेवा, तांत्रिक मदत, उत्पादन वापराचे प्रात्यक्षिक इ. या सेवांच्यामुळे ग्राहक मिळविण्यासाठी मदत होते.
- वस्तूंची किंमत निश्चिती: किंमत निश्चिती हे विपणनाचे एक अत्यंत महत्त्वाचे तसेच आव्हानात्मक असे कार्य आहे. कित्येक वेळा वस्तूच्या किमतीवरच उत्पादनाचे यशापयश अवलंबून असते. किंमत निश्चिती ही बाजारपेठेत अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. खासकरून जेथे तीव्र स्पर्धा अस्तित्वात असते. वस्तूची किंमत निश्चित करताना उत्पादन खर्च, अपेक्षित नफा, स्पर्धात्मक वस्तूंच्या किमती, वस्तूला असलेली मागणी, बाजारपेठेच्या गरजेनुसार व्यवसायाने वस्तूंच्या किंमतीत बदल केला पाहिजे. वस्तूंच्या किमती फारच जास्त असतील तर ग्राहक गमावण्याची शक्यता असते, परंतु वस्तूंच्या किंमती फारच कमी असतील तर तोटा होण्याची शक्यता असते; म्हणूनच योग्य किंमत ठरविताना बाजारपेठेचे सखोल संशोधन गरजेचे असते.
- विक्रयवृद्धी यंत्रणा: ग्राहकांना वस्तूविषयी, त्यांच्या वैशिष्ट्याविषयी, वापराबाबत, किमती बाबत माहिती देऊन आणि वस्तू खरेदी करण्याविषयी त्यांना प्रोत्साहन करण्याच्या प्रक्रियेस विक्रयवृद्धी संवर्धन असे म्हणतात. जाहिरात, प्रसिद्धी, व्यक्तिगत विक्री आणि विक्री संवर्धन ही काही विक्रयवृद्धीची महत्त्वपूर्ण शस्त्रे आहेत. विक्रयवृद्धीसाठी वरील चार पद्धती किंवा त्यांचे एकत्रीकरण व्यवसायाकडून केले जाते. विक्रयवृद्धीच्या कार्यामुळे बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होते.
- वितरण: उत्पादनाच्या ठिकाणी तयार झालेला पक्का माल उपभोक्त्यापर्यंत पोहचविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व कार्यांना मिळून वितरण असे म्हणतात. यामध्ये वाहतूक, गोदाम, वस्तूंची हाताळणी, साठा नियंत्रण आदेशाप्रमाणे माल पाठविण्याची प्रक्रिया, बाजारपेठेचा अंदाज, संवेष्टन, उत्पादनाचे व साठवणुकीचे ठिकाण आणि ग्राहक सेवा यांचा समावेश होतो. व्यवसायाच्या विपणन अंदाजपत्रकातील खर्चाचा वितरण हा एक मुख्य भाग आहे. उत्पादनाचा प्रकार व ग्राहकांचे अपेक्षित समाधान हे संस्थेच्या प्रत्यक्ष वितरणावर अवलंबून असते.
- वाहतूक व्यवस्था: उत्पादनाच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत वस्तूंच्या भौतिक वितरण कार्यास वाहतूक असे म्हणतात. वाहतूक व्यवस्थेमध्ये पक्क्या मालाबरोबरच कच्च्या मालाच्या वाहतुकीचा समावेश होतो. उत्पादन, विक्री व उपभोग ही तिन्ही कार्ये एकाच ठिकाणी चालावित अशी अपेक्षा करता येत नसल्यानेच वाहतुकीची गरज निर्माण होते. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते, भौगोलिक सीमांचे विश्लेषण, उत्पादनाचे स्वरूप (खर्च) निर्देशित बाजार, गती, विश्वसनीयता, वारंवारिता, सुरक्षितता इत्यादिची मदत वाहतुकीचे मार्ग ठरविताना होते. रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक, रेल्वेवाहतूक, पाईपलाईन (बंदिस्त नलिका) या वाहतुकीच्या मार्गांचा व्यवसायात उपयोग केला जातो.
- गोदामे: वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची विक्री यामध्ये काही कालावधी जातो. सदरच्या कालावधीत झालेल्या दुर्लक्षामुळे वस्तूंच्या साठ्याला हानी पोहचू शकते. गोदामामुळे मालाचा प्रवाह व्यवस्थितपणे नियंत्रित होतो. बाजारात वस्तूच्या किमतीत स्थैर्य राखण्यासाठी सुद्धा याची मदत होते. गोदामाची कार्ये ही किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी आणि उत्पादक यांच्याकडून पार पाडली जातात. गोदामामुळे काल किंवा समय उपयोगिता निर्माण होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?