Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे कोणतेही पाच घटक स्पष्ट करा.
दीर्घउत्तर
उत्तर
- अनुवंश: पालकांकडून अपत्याकडे जन्माच्या वेळी संक्रमित होणारे सर्व गुणधर्म म्हणजे अनुवंश होय. अनुवंशाचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होतो. उदा, उंची, वजन, अवयवांची प्रमाणबध्दता, डोळ्यांचा रंग इ. अनुवंशाने निर्धारित झालेली गुणवैशिष्ट्ये व्यक्तीच्या स्वसंकल्पनेवर प्रभाव पाडू शकतात व त्याचा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो.
- अंतःस्रावी ग्रंथी: पियुषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, पीनियल ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी इत्यादी ग्रंथी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम करतात. विविध ग्रंथींमधून स्रवणारे हार्मोन्स कमी किंवा अधिक प्रमाणात स्रवल्यास त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदा. कंठस्थ ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉक्सिनचे प्रमाण वाढले असता व्यक्तीमध्ये उदासीनता, ताणतणाव, चिडचिडेपणा, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता, निर्माण होते व त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- कुटुंब: कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती, कुटुंबातील भावनिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील सदस्यांच्या आंतरक्रिया, बालसंगोपनाच्या विविध पध्दती इत्यादी कुटुंबाशी संबंधित घटकांचा व्यक्तिमत्त्वावर ठळकपणे प्रभाव पडतो. उदा., ज्या कुटुंबात भावनिक उबदारपणा असतो अशा कुटुंबात पालकांचे त्यांच्या पाल्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. पालकांनी दर्शवलेल्या प्रेमामुळेव आदरामुळेपाल्यांचा आत्मविश्वास आणि स्व आदर वाढीस लागतो व त्याचा पाल्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो.
- समवयस्क गट: समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे. पूर्व बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत दैनंदिन जीवनात समवयस्क आपल्याबरोबर असतात. वर्गातील मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, क्रीडा मंडळातील सदस्य इत्यादींचा समवयस्क गटात समावेश होतो. समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, नियमित अभ्यास करणे, स्वत:बद्दल व विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणे, इत्यादी चांगल्या सवयींचा सुसंगतीमुळे विकास होऊ शकतो.
- शाळा: विदयार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम, शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिक्षकांचा विदयार्थ्यांशी असलेला संवाद, शाळेतील शिस्त व शाळेची धोरणे, इत्यादी शाळेशी संबंधित घटकांचा विदयार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. उदा., सृजनशील, उच्च शिक्षित, अनुभवी, सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थ्यासाठी आदर्श ठरतो. असे शिक्षक विदयार्थ्यांतील सुप्त गुणांच्या विकासास जास्तीत जास्त संधी पुरवतात. परिणामी विदयार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्त्व सुयोग्य पद्धतीने घडवण्यात मदत होते.
shaalaa.com
व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?