Advertisements
Advertisements
Question
खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:
(य) मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणार्या वाङ्मय प्रकाराचे नाव लिहा. (१)
(र) कथेचे मुख्य वैशिष्ट्य लिहा. (१)
मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वांत जास्त वाचला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे 'कथा' होय. दिवाळी अंकांमध्ये कथेला मानाचे पान दिले जाते, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने - उदा., टी. व्ही. वगैरे खूप नंतर उदयास आली; पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टीवेल्हाळ झाला तो तिच्या 'मनोरंजकता' या वैशिष्ट्यामुळेच. मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याचीही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून 'मूल्यविचार' रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्त्वे कथावाङ्मयात जागोजागी आढळतात. |
(२) कथेच्या माध्यमांतून वाचकांच्या मनावर केले जाणारे मूल्यसंस्कार लिहा. (२)
Solution
(१)
(य) मराठीत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराचे नाव 'कथा' आहे.
(र) कथेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'मनोरंजन व मूल्यसंस्कार' होय.
(२) कथेमध्ये पात्रे वास्तवातील माणसांसारखीच साकारलेली असतात. त्यांची वागणूक, बोलणे आणि घटना-प्रसंगांतून चांगल्या व वाईट मूल्यांचे दर्शन घडते. कथेमध्ये या दोन्ही मूल्यांमध्ये संघर्ष होतो, आणि शेवटी चांगल्या मूल्यांचा विजय दाखवला जातो. या संघर्षातून वाचकाला प्रेरणा व स्फूर्ती मिळते, तसेच तो त्यातून बोध घेतो. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, मानवता यांसारखी उदात्त मूल्ये वाचकाच्या मनावर संस्कार घडवतात. त्यामुळे आपल्याला जीवनात कोणता मार्ग स्वीकारावा आणि कोणता टाळावा, याचे मार्गदर्शन मिळते. हेच खरे सुसंस्कार असतात. अशा प्रकारे, कथेच्या माध्यमातून मूल्यविचार आपोआप रुजत जातात.