Advertisements
Advertisements
Question
खाली दिलेल्या मुद्द्यांवरून आकर्षक कथा लिहा:
शेतकऱ्याची मुलं - अजित व सुजित - अजित मेहनती - सुजित आळशी - सुजितला वारंवार मेहनतीचा सल्ला - सुजितने न ऐकणे - शेतकऱ्याचे परगावी जाणे - भरपूर काम करण्याचे आदेश मुलांना देणे - अजित यशस्वी - सुजित अयशस्वी
Solution
सुजितला मिळाला योग्य धडा
सीतापूर नावाच्या एका सुंदर गावात एक मेहनती शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो विविध प्रकारची पीके घेत असे, ज्यामुळे त्याला चांगले उत्पन्न मिळायचे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्याने आपले जीवन सुखी आणि समाधानी बनवले होते. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले – अजित आणि सुजित होती. त्याला आणि त्याच्या पत्नीला दोन्ही मुलांनी यशस्वी व्हावे, असे मनापासून वाटत असे.
शेतकरी आपल्या मुलांना नेहमी मेहनतीचे महत्त्व पटवून देत असे आणि चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या दोन मुलांपैकी अजित मेहनती आणि कर्तव्यदक्ष होता, तर सुजित आळशीपणाला चिटकलेला होता. अजित नेहमी आईवडिलांना घरातील व शेतातील कामांमध्ये मदत करायचा, पण सुजित नेहमी काम टाळायचा. शेतकरी सुजितला मेहनतीचे फायदे समजावून सांगत असे, पण सुजित त्याकडे दुर्लक्ष करत असे.
एक दिवस शेतकऱ्याला परगावी जाण्याची वेळ आली. जाताना त्याने दोन्ही मुलांना शेतातील सर्व जबाबदारी सोपवली आणि भरपूर काम करण्याचा आदेश दिला. शेतकऱ्याला आपल्या अनुपस्थितीत मुलांचे वर्तन पाहायचे होते.
काही दिवसांनी परत आल्यावर शेतकऱ्याला समजले की अजितने त्याला सांगितलेली सगळी कामे पूर्ण केली होती, तर सुजित मात्र शेतात नुसता बसून वेळ घालवत होता. हे पाहून शेतकरी संतापला आणि दोन्ही मुलांना घरी बोलावून सुजितला फटकारले. त्याने सुजितला काम न केल्याबद्दल घराबाहेर पडून स्वतःच्या कष्टाने पैसे कमवून परत यावे, असे सांगितले. वडिलांच्या या कठोर शब्दांमुळे सुजितला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने वडिलांची माफी मागून मेहनत करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्याने त्याला माफ केले आणि दोघा भावांनी मिळून काम करण्याचे सांगितले. अखेरीस, सुजितने आपला आळस सोडून मेहनतीचे महत्त्व ओळखले.
तात्पर्य: मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.