Advertisements
Advertisements
Question
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) रिकाम्या जागा पूर्ण करा: 2
- कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______
- कवीचा जवळचा मित्र - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली; भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. |
(2) खालील आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 2
- 'रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले.'
- कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद.
(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा: 2
- डोईवर -
- दारिद्रय -
- हरघडी -
- पोलाद -
(4) काव्यसौंदर्य: 2
कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
Solution
(1)
- कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - हात
- कवीचा जवळचा मित्र - अश्रू
(2)
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
- दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो.
(3)
- डोईवर - डोक्यावर
- दारिद्रय - गरिबी
- हरघडी - प्रत्येक वेळी
- पोलाद - लोखंड
(4)
कवी नारायण सुर्वे यांच्या 'दोन दिवस' या कवितेत कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्रित केले आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही या कष्टकऱ्याना रोज प्रचंड कष्ट करावे लागतात. हे कष्ट उपसण्याच्या नादात, त्या कामगाराला आपल्या सुंदर आयुष्याचा, आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा आस्वाद घ्यायला वेळच नसतो. त्याला रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. गरिबी कायम सोबतीला असते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टमय जीवनाला अश्रूंची सोबत असते. दु:ख पचवण्याचे, त्यावर मात करून पुढे जात राहण्याचे बळ गोळा करावे लागते.
झोतभट्टीतील पोलाद ज्याप्रमाणे तावून सुलाखून बाहेर पडते त्याप्रमाणे कामगारांचे आयुष्य नाना तऱ्हेच्या संकटांनी, दु:खांनी होरपळून निघत असते, तरीही हा कामगार नेहमी कष्ट करत राहतो. या दु:खांत होरपळल्यामुळे त्याचे सामर्थ्य जणू वाढीस लागते. दु:खांचा, परिस्थितीचा बाऊ न करता, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले आयुष्य पुढे जगतच राहतो. अशाप्रकारे, कष्टाशी, दु:खांशी झुंज देण्यात या कष्टकऱ्यांचे अवघे आयुष्य व्यतीत होते.