Advertisements
Advertisements
Question
प्रदेश कशाला म्हणतात?
Solution
प्रादेशिक भूगोलात प्रदेश ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. एका विशिष्ट प्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचा अभ्यास प्रादेशिक भूगोलात केला जातो. प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी वेगवेगळ्या निकषांवर आधारित सामूहिक गुणधर्म किंवा समस्या असलेले लहान किंवा मोठ्या विस्ताराचे सलग, एक समान क्षेत्र म्हणजे प्रदेश होय.
थोडक्यात समान वैशिष्ट्ये, गुणधर्म किंवा समस्या असणाऱ्या छोट्या किंवा मोठ्या सलग क्षेत्राला प्रदेश म्हणतात.
प्रदेश लहान किंवा मोठा असू शकतो, तसेच प्रत्येक प्रदेशाला एक निश्चित सीमारेषा असते. ही सीमारेषा एका प्रदेशाला दुसऱ्या प्रदेशापासून पूर्णतः वेगळे करते.
प्रदेशाच्या सीमा या प्राकृतिक, राजकीय किंवा अन्य घटकांच्या आधारे ठरवल्या जातात.
प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे स्वतंत्र गुणधर्म असतात व त्यामुळे प्रत्येक प्रदेश इतरांपेक्षा वेगळा असतो. असे असले तरी एक प्रदेश हा त्याहीपेक्षा एका मोठ्या प्रदेशाचा भाग असू शकतो. उदा., पंजाब हा प्रदेश उत्तर भारतीय मैदानाचाच एक भाग आहे. महाराष्ट्रातील पठारी प्रदेश हा भारताच्या दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. भारत हा देश आशिया या विशाल प्रदेशाचाच एक भाग आहे. याचा अर्थ अनेक लहान प्रदेश मिळून एक मोठा प्रदेश बनतो किंवा असेही म्हणता येईल की, एक मोठा प्रदेश इतर घटकांच्याआधारे लहान लहान प्रदेशात किंवा उप प्रदेशात विभागता येतो.
प्रदेशाला एक विशिष्ट स्थान असते, भौगोलिक विस्तार असतो, सीमारेषा असतात आणि प्रदेश शृंखला यांमुळे त्यात एक श्रेणीबद्ध उतरंड असते.
प्रत्येक प्रदेश भौगोलिक अभ्यासासाठी तसेच अन्य काही उपयोगांसाठी एक निश्चित मूलभूत एकक म्हणून मानला जातो. गुणधर्मातील क्षेत्रीय विविधतेमुळे विविध निकषांच्या आधारे विविध प्रदेश निर्माण केले जातात किंवा निर्माण करता येतात. उदा., प्राकृतिक गुणधर्मानुसार : पर्वतीय प्रदेश, वनप्रदेश, मृदा प्रदेश, हवामान प्रदेश असे प्रदेश पाडता येतात. आर्थिक गुणधर्मानुसार : विकसित प्रदेश, अविकसित प्रदेश, औद्योगिक प्रदेश, विशिष्ट पिक प्रदेश, विशिष्ट साधनसंपत्तीचा प्रदेश, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार पाडलेले प्रदेश असे विविध आर्थिक प्रदेश ठरवता येतात. सामाजिक गुणधर्मानुसार कमी किंवा जास्त साक्षरता असणारा प्रदेश, जास्त स्थलांतरित असणारा प्रदेश, कुपोषणग्रस्त प्रदेश असे प्रदेश ठरवले जातात. सांस्कृतिक गुणधर्मानुसार आदिवासींचा प्रदेश, कोळी समाजाचा प्रदेश, विविध भाषिकांचा प्रदेश, विविध वंशांचा प्रदेश असे प्रदेश ठरवले जातात.