Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) उत्तरे लिहा: (२)
(य) लेखकाला दातदुखीचा संशय येण्यामागचे कारण लिहा.
(र) लेखकाच्या दृष्टीने परशा विचारत असलेला उर्मट सवाल लिहा.
(२) परशा पहिलवानाची दोन वैशिष्ट्ये लिहा: (२)
(य) ............
(र) .............
मनुष्यस्वभावाप्रमाणे मीही प्रथम दातांची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पहेलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातांपुढे चारीमुंड्या चीत झालेला मी पाहिला, तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. परशा हा जन्मापासून पहेलवान. रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला. अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा, की जसा काय वनराजच! छाती इतकी पुढे काढायचा, की अनेकदा आधी त्याची छातीच दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला, की “काय रं, कुटं निगालास?” असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ; पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. “चाललोय कुस्ती मारायला... येतोस?” “कुस्ती?” असे म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि “अरं, अगुदर माशी तर मार नाकावरली... मग कुस्तीचं बगू” असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा; पण गंमत अशी, की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. “लइ हाडं हैत तुझ्या अंगात! दगडावाणी लागत्यात हाताला.” असे त्याने म्हटले, की हाडाच्या बाबतीत का होईना; पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आपल्या ताकदीची-मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो ‘शिंव्ह’ म्हणायचा. स्वतःला ‘शिंव्ह’ म्हणवून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. |
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
परशाचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
‘दातदुखीच्या अनुभवाचे वर्णन’ तुमच्या शब्दांत करा.
उत्तर
(१)
(य) लेखकाने दात दुखणाऱ्या माणसांची अवहेलना केली होती. परंतु, परशा पहेलवानासारखा मजबूत आणि धाडसी माणूस दातदुखीमुळे त्रस्त झालेला पाहिल्यावर लेखकाला दातदुखीचा संशय आला.
(र) “काय रं, कुटं निगालास?” हा परशाचा प्रश्न लेखकाला उर्मट वाटायचा.
(२)
(य) धाडसी आणि ताकदवान: परशा पहेलवान जन्मापासून बलवान होता. त्याने अनेक वेळा लांडग्यांशी झुंज देऊन त्यांचे सुळे फोडले होते.
(र) घमेंड आणि आत्मविश्वास: परशाला स्वतःच्या ताकदीची मोठी घमेंड होती. तो स्वतःचा उल्लेख ‘शिंव्ह’ (सिंह) म्हणून करत असे, यावरून त्याच्या अभिमानाची जाणीव होते.
(३) परशा पहेलवान हा जन्मजात ताकदवान आणि धाडसी होता. तो लांडग्यांशी लढलेला, मजबूत शरीराचा आणि आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती होता. त्याच्या चालण्याच्या ऐटीवरून तो स्वतःला शक्तिशाली समजत असे. तो नेहमी आत्मगौरव करत असे आणि स्वतःला ‘शिंव्ह’ (सिंह) म्हणवून घेत असे. त्याला स्वतःच्या ताकदीचा फार अभिमान होता.
किंवा
सुरुवातीला मला दातदुखीचे महत्त्व वाटत नव्हते आणि मी अशा लोकांची थट्टा करत असे. पण जेव्हा मी बलवान परशा पहेलवानाला दातदुखीमुळे त्रस्त पाहिले, तेव्हा मीही दातदुखीबाबत गंभीर होऊ लागलो. दातदुखी माणसाला किती असह्य वेदना देऊ शकते हे मला उमगले. हळूहळू मला जाणवले की ही वेदना सहज दुर्लक्षित करता येणारी नाही, आणि याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.