Advertisements
Advertisements
प्रश्न
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट करा. ही समस्या सोडविण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल?
सविस्तर उत्तर
उत्तर
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे:
- पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणाम: मानवप्राणी निसर्गाकडून अधिकाधिक लाभ मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. बेसुमार जंगलतोड, नैसर्गिक स्रोतांचा प्रमाणाबाहेर उपयोग, 'विकासासाठी' वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक स्थळांचा विनाश, वाढते प्रदूषण आणि ओझोन वायूचा थर पातळ होण्यास कारणीभूत असणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन, याच्या परिणामामुळे वितळू लागलेले बर्फाचे ध्रुवीय आवरण, तसेच हवामानातील अनपेक्षित बदल या सर्व गोष्टींचा अंतिम परिणाम नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात होतो.
- जागतिकीकरणाचा परिणाम: जागतिकीकरणामुळे बाजारीकरण आणि चंगळवाद यांमध्ये वाढ झाली आहे. खुल्या बाजारपेठांमुळे परदेशी कृषीमाल भारतात मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो. त्यामुळे भारतातील कृषीमालाच्या खपावर प्रतिकूल परिणाम होतो.
- कर्जबाजारीपणा: शेतकरी प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बहुतेक वेळेला सरकारी संस्था, बँका किंवा सावकार यांच्याकडून कर्ज घेतात; परंतु जर पीक नीट आले नाही तर घेतलेले कर्ज फेडणे त्यांना अनेकदा शक्य होत नाही. नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अखंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आयुष्य जगत राहतो. अशा निराशाजनक परिस्थितीत काही शेतकरी आत्महत्येचा निर्णय घेतात. याशिवाय महागडे बियाणे विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा कर्ज घ्यावे लागते. त्यातून शेतकरी अधिकाधिक कर्जबाजारी होत जातो.
- अज्ञान: कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि लागवडीच्या पद्धती यांची माहिती शेतकऱ्यांना असतेच असे नाही. हे अज्ञान शेतकऱ्यांच्या प्रगतीमधील एक मोठा अडथळा आहे.
- जमिनमालकीची विषमता: भारतातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचा निकष लावला तर असे दिसून येते की, ते वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहेत. जसे की, मोठ्या जमिनीची मालकी असणारे शेतकरी, मध्यम भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर. जमीनदारांकडे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीची मालकी असते. तसेच मध्यम ते छोटे भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या तुलनेत मोठ्या जमीनदारांची आर्थिक परिस्थिती सुरक्षित असते. भूमिहीन शेतमजूरांचा एक मोठा गट रोजंदारीसाठी इतरांच्या शेतजमिनीवर अवलंबून असतो.
- हुुंडापद्धती: ग्रामीण भारतातील शेतकरी हुंडापद्धतीच्या प्रथेमुळे खचून गेलेला आहे. अनेकदा ते शेतकामाच्या निमित्ताने ते बँका, पतपेढ्या यांसारख्या संस्था किंवा सावकाराकडून कर्ज काढतात. परंतु कर्जाची रक्कम हुंडा देण्यासाठी आणि खासगी कामासाठी खर्च करून बसतात. हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा असूनही़ ही दुष्ट प्रथा थांबलेली नाही. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये हे कारण प्रामुख्याने पुढे आलेले आहे.
शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे उपाय:
- संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था: अवर्षण, नापिकी, कर्जबाजारी स्थिती यांसारख्या आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळतात तेव्हा त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असणे आवश्यक आहे.
- विमा: नैराश्यजनक परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिलासा मिळावा यासाठी आयुर्विमा तर नापिकीच्या आणि किडीच्या नुकसानीसाठी शेतीचा पीक विमा मिळायला हवा.
- शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना: ग्रामीण भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी भारताच्या अनेक भागांमध्ये पाठवला जाऊ शकतो. त्यासाठी दूरवरच्या बाजारपेठा आणि शेतकरी यांच्यामध्ये मध्यस्थांची, दलालांची साखळी उभी राहते. विक्रीतील नफ्याचा सर्वाधिक हिस्सा या मध्यस्थ आणि दलालांच्या खिशात जातो. शेतकऱ्याच्या, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्याच्या वाट्याला नफ्यातील फारच कमी हिस्सा येतो. मध्यस्थ आणि दलाल यांचे महत्त्व कमी करणाऱ्या ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना’ शेतकऱ्यांचे शोषण थांबवू शकतील.
- पाण्याचा संचय (पाणीसाठा): सिंचन ही शेतीची मूलभूत गरज आहे. मात्र भारतात पूर, अवर्षण हे नेहमीचेच आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा संचय आणि पाण्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. पाण्याचा संचय करण्याची जबाबदारी फक्त सरकारची आहे अशी मनोधारणा चुकीची आहे. त्यासाठी विविध संस्था आणि व्यक्तीगत पातळीवर लोकांनीही पुढे येणे गरजेचे आहे.
- बँकांची भूमिका: बँका तसेच सहकारी पतपेढ्या यांनी कर्जवितरणाचे त्यांचे नियम आणि अटी शेतकऱ्याला जाचक ठरू नयेत हे पाहणे जरूरीचे आहे. तसेच शेतकऱ्यांना बचतीची सवय व्हावी म्हणून प्रयत्न करणेही गरजेचे आहे. बँका आणि आर्थिक निधीचा पुरवठा करणाऱ्या इतर संस्थांकडून कर्ज मिळवण्यातील कायदेशीर अडचणींमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनांचा त्यांना फारसा उपयोग होत नाही.
- आंतरपीकपद्धती: वर्षातून एकदाच एक पीक घेण्याऐवजी दोनदा किंवा शक्य असल्यास तीनदा पीक घेणे तसेच आंतरपिके घेणे हे अधिक लाभदायक ठरेल. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि उत्तम बियाणे, खते, कीटनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
shaalaa.com
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?