Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा.
उत्तर १
व्यापार म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू किंवा सेवांचे हस्तांतरण. व्यापारावर परिणाम करणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, आर्थिक खर्च, विशेषीकरण इ.
- नैसर्गिक संसाधने: नैसर्गिक संसाधनांचे वितरण असमान आहे. एका देशात उपलब्ध नैसर्गिक संसाधने दुसऱ्यापेक्षा वेगळी आहेत. या असमान वितरणामुळे ज्या देशांकडे जास्त संसाधने आहेत आणि जिथे कमी आहेत, त्यांच्यात व्यापार होतो.
- हवामान: हवामानाचा प्रामुख्याने प्रदेशातील वनस्पती आणि प्राण्यांवर परिणाम होतो. वेगवेगळ्या हवामानाच्या क्षेत्रात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात, उदाहरणार्थ, श्रीलंका सारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये, ज्यांची प्रमुख निर्यात चहा आहे किंवा मलेशिया आणि इंडोनेशिया, ज्यांची प्रमुख निर्यात रबर आहे. चहा आणि रबर वनस्पती वाढवण्यासाठी या देशांच्या अनुकूल हवामानामुळे हे नैसर्गिकरित्या घडते.
- लोकसंख्या: देशांमध्ये लोकसंख्येचा आकार, वितरण आणि घनता भिन्न असते. यामुळे उत्पादन आणि वापरात फरक होतो आणि म्हणूनच व्यापार होतो. राहणीमान देखील विविध वस्तू आणि सेवांची मागणी निश्चित करू शकते. कमी लोकसंख्या असलेला देश व्यापारावर अधिक अवलंबून असतो कारण वस्तूंच्या उत्पादनात कमी मानवी संसाधने गुंतलेली असतात.
- संस्कृती: काही देश त्यांच्या विशिष्ट कला आणि हस्तकलेसाठी ओळखले जातात, जे त्यांच्या संस्कृती आणि जागतिक बाजारपेठ असलेल्या वस्तूंच्या विशिष्ट उत्पादनावर आधारित असतात, उदा. काश्मिरी शाल किंवा इराणी गालिचे.
- आर्थिक खर्च: उत्पादन प्रक्रियेत उत्पादन खर्च हा प्रमुख घटक असतो. काही वस्तू आयात करणे हे देशात उत्पादन करण्यापेक्षा स्वस्त असते. उदाहरणार्थ, भारत आणि श्रीलंकेतून चहा आयात करणे इंग्लंडमध्ये उत्पादन करण्यापेक्षा स्वस्त असते.
- विशेषज्ञता: उत्पादनाच्या अत्यंत अनुकूल घटकांमुळे, काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंसाठी विशेषज्ञता असते आणि त्यांना जागतिक बाजारपेठेत नाव आणि प्रसिद्धी मिळते, म्हणून ते निर्यात व्यापार विकसित करतात. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडमधील घड्याळे, जपानमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा अर्जेंटिनामधील टेंडर बीफ.
- सरकारी धोरण: निर्यात किंवा आयातीबद्दलचे सरकारी धोरण व्यापारावर परिणाम करते. उदाहरणार्थ, लोकांना देशांतर्गत वस्तू खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकार काही वस्तूंवर आयात शुल्क वाढवू शकते. अशा प्रकारे, त्या वस्तूंचा आयात व्यापार कमी होतो.
उत्तर २
व्यापार हा माणसाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे. व्यापारामुळे वस्तूंची आणि सेवांची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या विविध गरजा भागवतो. व्यापारात कृषी उत्पादने, औद्योगिक उत्पादने, खनिजे, ग्राहकोपयोगी उत्पादने अशा असंख्य वस्तूंची देवाणघेवाण होते. सुरुवातीस व्यापार हा स्थानिक पातळीवर केला जात असे, मात्र आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे व्यापाराने जागतिक स्वरूप घेतले आहे, असे असले तरी व्यापार हा जगात सर्वत्र सारखा नाही. प्रत्येक देशाची भौगोलिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समतोल नसल्यामुळे त्या त्या देशाचा व्यापारातील सहभागही कमी-जास्त असतो. जागतिक व्यापारावर पुढील घटक परिणाम करतात:
- अंतर: एखाद्या साधनसंपत्तीचा उत्पादक प्रदेश आणि त्या साधनसंपत्तीची मागणी करणारा प्रदेश यांमधील भौगोलिक अंतर हा व्यापारावर प्रभाव पाडणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र भौगोलिक अंतरा बरोबरच आर्थिक अंतर म्हणजेच वाहतूक खर्च; राजकीय अंतर म्हणजे राजकीय मैत्री हे घटकही व्यापारावर परिणाम करतात.
- साधनसंपत्तीचे वितरण: पृथ्वीवरील नैसर्गिक घटक, साधनसंपत्ती यांचे वितरण असमान आहे. त्यामुळेच मृदा, वने, कृषी उत्पादने, खनिज संपत्ती काही प्रदेशात मुबलक तर काही प्रदेशात दुर्मीळ आहे, ही तफावत व्यापार निर्मितीस कारणीभूत ठरते.
- उत्पादनामधील तफावत: पृथ्वीवरील साधनसंपत्तीच्या वितरणात जशी तफावत आढळते, तशीच तफावत विविध वस्तूंच्या उत्पादनातही आढळते. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या विकसित देशात यांत्रिकीकरणामुळे, औद्योगिक क्रांतीमुळे वस्तूंचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतले जाते. याउलट मागासलेल्या देशात पारंपरिक हस्तकले मुळे उत्पादन कमी होते. हा विरोधाभासही व्यापारास कारणीभूत ठरतो.
- हवामान: पृथ्वीवरील हवामान सर्वत्र भिन्न असते. शिवाय ऋतुमानाप्रमाणे त्यात बदलही होत असतात. या हवामानामुळे वस्तूंचे उत्पादन, वाहतूक, समुद्राची स्थिती, मंदिरांची स्थिती यांवरही परिणाम होतो. त्याचा परिणाम पुढे व्यापारावर होतो. उदा., नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे मुंबई बंदराजवळील समुद्र जून ते सप्टेंबरदरम्यान वाहतुकीस तितकासा पोषक नसतो. तसेच तीव्र हिवाळ्यामुळे युरोपमधील काही बंदरे काही काळासाठी गोठून जातात.
- लोकसंख्येचे वितरण: ज्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते, तेथे विविध वस्तूंना सतत मागणी असते. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होतो.
- लोकसंख्येचे राहणीमान: लोकसंख्येप्रमाणे लोकसंख्येची कारकशक्ती देखील व्यापारावर प्रभाव पाडते. ज्या देशाचा आर्थिक विकास झाला आहे. त्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. अशा देशातील लोकांचे राहणीमानही असते. साहजिकच त्यांची क्रयशक्ती जास्त असल्यामुळे तेथे विविध वस्तू व सेवांची सतत वाढती मागणी असते ज्यामुळे व्यापार वाढतो.
- आर्थिक, औद्योगिक विकासाचे स्वरूप: देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा व्यापारातील सहभागावर प्रभाव पडतो. देश अतिविकसित असल्यास असा देश औद्योगिकीकरणात अग्रेसर असतो व तो देश तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो. देश विकसनशील असल्यास असा देश ग्राहकोपयोगी उत्पादने, कच्चा माल इत्यादींची निर्यात करतो. मात्र देश मागासलेला असल्यास असा देश खनिजे, कृषी उत्पादने यांची प्रामुख्याने निर्यात करतो.
- गुंतवणूक: व्यापारासाठी उत्तम बंदरे, आधुनिक जहाजे, संदेशवहनाची आधुनिक साधने इत्यादी पायाभूत सुविधांची गरज असते. या सुविधा पुरवण्यासाठी गुंतवणुकीची गरज असते. जेथे अशी गुंतवणूक होते त्या देशाची व्यापारवृद्धी जलद होते.
- वाहतुकीच्या सोयी आणि विकसित पार्श्व प्रदेश: व्यापारासाठी बंदराजवळील प्रदेशाचाही उत्तम विकास होणे आवश्यक असते. बंदराजवळच्या प्रदेशात दळणवळणाच्या, वाहतुकीच्या सोयीचा उत्तम विकास होणे गरजेचे असते. जेणेकरून आयात केलेल्या मालाचे जलद वितरण आणि निर्यात करावयाच्या मालाचे जलद संकलन शक्य होते.
- संदेशवहन: व्यापारात मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींना एकत्रित आणण्यासाठी जलद संदेशवहनाची गरज असते. बाजारपेठेजवळ अदययावत माहिती मिळवण्यासाठी, तसेच वेळेची बचत होण्यासाठी आधुनिक संदेशवहन व्यापारावर परिणाम करते.
- शासकीय धोरण आणि राजकीय संबंध: प्रत्येक देशाचे आयात-निर्यातसंदर्भात एक धोरण असते. या धोरणानुसार काही वस्तूंच्या व्यापारावर निबंध असतात, तर काही वस्तूंच्या व्यापारासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते. शासकीय धोरणाप्रमाणेच जगातील इतर देशांशी असणाऱ्या राजकीय संबंधाचा परिणामही व्यापारावर होतो. उदा., भारत व चीन यांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन देशातील व्यापारावर परिणाम होऊ शकतो. याउलट भारत, रशिया, अमेरिका व युरोपीय देशांचे राजकीय संबंध विश्वासाचे आहेत त्याचा परिणाम त्यांच्यातील व्यापारावर होतो.
- आंतरराष्ट्रीय धोरण: दहशतवाद किंवा चोरटा व्यापार, अंमली पदार्थांचा व्यापार, वसाहतवाद यांसारख्या समस्यांशी लढण्याकरिता काही देशांविरुद्ध संयुक्त राष्ट्र काही निश्चित असे धोरण आखतात. अशा प्रकारच्या धोरणांमुळे त्या देशाच्या व्यापारावर परिणाम होतो. उदा., अन्न, वस्त्र बंदी प्रयत्नांचा एक भाग म्हणून चीन, उत्तर कोरिया यांसारख्या देशांवर सध्या काही निर्बंध लागू आहेत.
- जकात आणि कर: व्यापारावर परिणाम करणारे हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक देश आपल्या आयात-निर्यात धोरणानुसार आयात-निर्यात कर आणि जकात आकारतो. काही वेळेस काही देश मात्र असा कोणताच कर आकारत नाहीत. त्याला मुक्तव्यापार म्हणतात. या सर्वांचा प्रभाव व्यापारावर होतो.
- जागतिकीकरण: जागतिकीकरणामुळे आता अनेक देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आपले जाळे जगभर विस्तारत आहेत. स्वस्त मजूर, जमीन व कच्चा माल उपलब्ध असलेल्या प्रदेशात उत्पादनांचे आणि सेवांचे आऊटसोर्सिंग हा आधुनिक जागतिक व्यापाराचा मंत्रच बनला आहे.
- जागतिक ताणतणाव: प्रत्येक देश आपापले आर्थिक, राजकीय हितसंबंध जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यामुळे विविध सैद्धांतिक मुद्द्यांवर जगातील देशांचे दुरीकरण किंवा पुनर्रचनात्मक, ध्रुवीकरण सतत होत असते. याचाच परिणाम म्हणून जगात अनेक गट तट निर्माण होतात आणि या गटांतील सुप्त संघर्षांचा व्यापारावर परिणाम होतो. उदा., जागतिक व्यापार परिषदांमध्ये कृषी क्षेत्रावरील विकसित देशांकडून दिले जाणारे अनुदान हा वादाचा मुद्दा आहे. थोडक्यात, जागतिक व्यापारावर फार गुंतागुंतीच्या मुद्द्याचा प्रभाव असून त्यामुळे जागतिक व्यापाराचे स्वरूपही फार क्लिष्ट झाले आहे.