English

भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

मानव आणि त्याचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. भूगोल हे एक प्राचीन शास्त्र असून या शास्त्रात पृथ्वीवरील घडामोडींचा अभ्यास केला जातो. भूगोल विषयाची व्याप्ती विस्तृत आणि सखोल आहे. भूगोल विषयाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन प्रमुख शाखा आहेत.
नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्नघटकांशी येणारा संबंध या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो.
मानवाच्या आजूबाजूचे पर्यावरण हे पूर्णतः प्राकृतिक किंवा नैसर्गिक असले, तरी मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. नैसर्गिक पर्यावरण नुसार मानवाच्या विकासाला वाव मिळतो किंवा मर्यादा पडतात. मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यासविषयांचा समावेश होतो.
भूगोलाच्या अभ्यासात प्राकृतिक किंवा मानवी घटकांच्या वितरणाला खूप महत्त्व आहे. भौगोलिक घटकांचे हे वितरण का? काय? कसे? कोठे? या प्रश्नांची उत्तरे भूगोल शास्त्राच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच भूगोल हे एक गतिमान आणि गतिशील शास्त्र आहे. भूगोलातील प्राकृतिक आणि मानवी घटक सातत्याने बदलत असतात आणि त्यामुळेच या वितरणाचे का? काय? कसे? कोठे? यांची उत्तरेही बदलत असतात. इतर विषयांप्रमाणेच भूगोलाच्या अभ्यासात प्रारूप अभ्यासाचेही महत्त्व आहे.
भौगोलिक घटकांचे वितरण हे एका विशिष्ट रचनेतून अभ्यासणे जास्त सोपे जाते आणि त्यामुळेच भूगोलात विविध प्रारूपे, प्रतिमाने, प्रतिकृती यांचाही विचार केला जातो. वितरण आणि प्रतिरूपाप्रमाणेच भूगोल विषयात कार्यकारणसंबंधाचाही विशेषत्वाने आग्रहपूर्वक अभ्यास केला जातो. त्यामुळेच भौगोलिक घटकांची कारणमीमांसा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. भूगोलाच्या अभ्यासात साहजिकच माहिती मिळवणे हा सर्वांत प्रमुख घटक ठरतो. ही माहिती स्थळकालसापेक्ष असते आणि त्यामुळेच भूगोलाच्या माहितीमध्ये कालमापन प्रदेश, क्षेत्र आणि त्यातील गतिशील घटक किंवा बदल यांची शास्त्रशुद्ध नोंद करणे याला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यासाठी विविध भौगोलिक साधने, तंत्रे वापरली जातात.
भौगोलिक माहिती मिळवणे, यासाठी सातत्यपूर्ण निरीक्षण आणि संशोधन करणे, या माहितीचे विश्लेषण करणे, विश्लेषणाच्या आधारे निश्चित ठाम निष्कर्ष काढणे, या निष्कर्षातून काही भौगोलिक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपात भूगोल शास्त्र विकसित होत आहे आणि यापुढेही होत राहील; म्हणून भूगोल शास्त्रात विकासाचे अनेक टप्पे आहेत.
सुरुवातीस भूगोलाचे स्वरूप हे प्रामुख्याने वर्णनात्मक होते. हेकेटस, टॉलेमी, स्ट्रॅबो यांनी भूगोल विषयावर विपुल लेखन केले. हेकेटस या ग्रीक तत्त्वेत्त्याने आणि स्ट्रॅबो या रोमन तत्त्वेत्त्याने जगाचा नकाशा तयार करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि विपुल लेखनामुळे भूगोल तज्ज्ञांना विश्लेषण करण्याची क्षमता आणि त्याचे महत्त्व कळले. या विश्लेषण क्षमतेतूनच भूगोल अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी दृष्टिकोनांचाही विकास झाला. कोणत्याही ज्ञानशाखेच्या विकासात अशा विविध दृष्टिकोनांचा उगम आणि पुढे त्याची अधिक चिकित्सा नेहमीच मोलाची भर घालते. या विविध दृष्टिकोनांमुळे पुढे भूगोलामध्ये भौगोलिक तत्त्वज्ञानाच्या निसर्गवाद आणि संभाव्यवाद असा द्वैतवाद निर्माण झाला. यातूनच भूगोल विषयाच्या काही म हत्त्वाच्या ज्ञानशाखांचा उदय आणि विकास झाला. भूगोल तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानशाखांचा अभ्यास व संबंधित ज्ञानशाखांचा विकास करताना इतर विषयातील गोष्टी आत्मसात करून त्या स्वीकारल्या व त्यांचा उपयोग केला. भूगोल विषयाच्या खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, कृषी भूगोल, जीव भूगोल, पर्यावरण भूगोल , मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, नकाशा शास्त्र, सुदूर संदेशवहन शास्त्र, भौगोलिक परिणाम पद्धती, भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादी प्रमुख ज्ञानशाखा विकसित झाल्या.
भूगोलाच्या विविध ज्ञानशाखांचा इतर विषयांशी खूप जवळचा संबंध असल्याचे दिसते. याचा अर्थ भूगोल तज्ज्ञ भौगोलिक घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारणभावाच्या चौकटीतच करतात. मात्र, हे स्पष्टीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने अधिक सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विदा विश्लेषण यांची गरज पडत आहे. त्यासाठी विविध प्रतिमानांचा वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्यही भूगोल तज्ज्ञ करीत आहेत. याच प्रक्रियेत भूगोलाच्या विविध अंतरशास्त्रीय शाखांच्या कक्षाही विस्तारत असून, भूगोलाचे स्वरूप अधिक गतिशील होत आहे. भूगोलाच्या अभ्यासात आता नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. दृक-श्राव्य माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, संगणक प्रणालींचा यथायोग्य वापर, विदा विश्लेषण, माहिती सत्तेचा विस्तार, सादरीकरण व त्यातील नावीन्य या सर्वांचा आता मुक्तपणे वापर करण्यात येत आहे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS (Geographical Information System), भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS (Geographical Positioning System). या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता नकाशा बनवले जातात. थोडक्यात, भूगोलाच्या अभ्यासकाला आता संगणकाचे अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य माहीत असणे आवश्यक आहे.
त्यामुळेच आज रोजी भूगोल हा एक एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे.

shaalaa.com
विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: भूगोल : स्वरूप व व्याप्ती - स्वाध्याय [Page 81]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
Chapter 8 भूगोल : स्वरूप व व्याप्ती
स्वाध्याय | Q ४. ३) | Page 81
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×