Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘माझा आवडता खेळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी निबंध लिहा.
उत्तर
माझा आवडता खेळ
खेळ म्हणजे माझा जीव की प्राण! अगदी गोट्या, कॅरमपासून क्रिकेटपर्यंत सर्व प्रकारचे खेळ खेळायला आणि विविध खेळांचे सामने दूरदर्शनवर पाहायला मला खूप आवडते; परंतु, माझा सर्वांत आवडता खेळ म्हणजे 'कबड्डी'. हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे, त्यामुळे तो रांगडा खेळ आहे. 'हुतूतू' या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे. हा मैदानी खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनसामग्रीची गरज नसते. आहे त्या परिस्थितीत हा खेळ खेळता येतो म्हणूनच मला तो खूप आवडतो. प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करणे, पेच वापरून आपले कौशल्य पणाला लावून आपल्या संघाला जिंकवून देणे यातील आनंद अवर्णनीय आहे.
कबड्डीचे मैदान दोन भागांत विभागलेले असते. त्याला कोर्ट म्हणतात. दोन्ही कोर्टच्या मध्यावर एक रेषा असते. या मध्यरेषेपासून सुमारे तीन मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये एक टचलाइन असते. टचलाइनपासून एक मीटर अंतरावर दोन्ही कोर्टमध्ये बोनसलाइन असते. दोन संघात प्रत्येकी १२ खेळाडू असतात. सात खेळाडू मुख्य, तर चार राखीव खेळाडू असतात. मला सात मुख्य खेळाडूंपैकी एक म्हणून खेळायला फार आवडते. खेळाडू मैदानात उतरले, की नाणेफेक जिंकणारा संघ सर्वप्रथम आपला खेळाडू प्रतिस्पर्धी संघात पाठवतो. या खेळाडूने सतत 'कबड्डी कबड्डी' म्हणायचे असते. जर त्याने हे थांबवले, तर तो 'बाद' म्हणून घोषित होतो. प्रत्येक संघात पकडण्यात तरबेज असणारे आणि स्पर्श करून पळण्यात तरबेज असणारे खेळाडू असतात. ते आपापल्या युक्त्या, पेच-डावपेच वापरून खेळ खेळत राहतात.
हा खेळ साधारणत: २०-२० मिनिटांच्या दोन भागांत खेळला जातो; हा खेळ मुख्यत: मातीत खेळला जातो; परंतु सध्या इनडोअर स्टेडिअममध्ये मॅटवर हा खेळ खेळला जात आहे. दोन्हींकरता शारीरिक क्षमता महत्त्वाची आहे. श्वासाचे तंत्र, चढाईचे व पकडीचे कौशल्य, चपळाई, शारीरिक सक्षमता, ही या खेळासाठीची आवश्यक कौशल्ये आहेत. ही कौशल्ये वाढवण्यासाठी नियमित सराव करणे, प्रशिक्षण घेणे, व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी विश्रांती घेणे हे सर्व प्रयत्न मी करत आहे.
सध्याच्या प्रो-कबड्डी लीगमधील अनुपकुमार हे माझे या खेळातील प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या खेळातून प्रेरणा घेऊन मीही व्यावसायिक कबड्डीपटू बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. 'कबड्डी' हा खेळ आता केवळ भारतापुरताच मर्यादित राहिला नसून इतर देशांनीही तो स्वीकारला आहे. याचा मला अभिमान वाटतो. हा आपल्या मातीतला रांगडा खेळ मला फार आवडतो.
संबंधित प्रश्न
खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उत्रौली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न.
दिनांक: २० डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उत्रौली (ता. भोर) : उत्रौली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० ते ६.०० या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री. अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती-ना-कोणती कला शिकणे आवश्यक आहे, हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदाशिव शिंदे यांनी भूषवले. कलाशिक्षिका श्रीमती सुनीता सोमण यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. |
(१) कोण ते लिहा.
(अ) समारंभाचे प्रमुख पाहुणे-
(आ) समारंभाचे अध्यक्ष-
(इ) चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे-
(२) उत्तर लिहा.
(अ) शिबिरार्थींची संख्या-
(आ) शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला-
(इ) शिबिराचे ठिकाण-
(ई) शिबिर सुरू झाले ती तारीख-
(३) वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा.
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) उत्तरे लिहा.
- जाहिरातीचा विषय -
- जाहिरात देणारे (जाहिरातदार) -
- वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक -
- जाहिरात कोणासाठी आहे?
(आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते?
(इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.
तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा.
‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.
प्रतिज्ञा आम्ही आमचे वर्तन बदलू. __________________ __________________ __________________ |
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
'शब्द' या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
महाराष्ट्रातील प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांविषयीची माहिती आंतरजालावरून मिळवा.
तुमची लाडकी ताई घरात नसली, तर तुम्हांला काय वाटते, ते थोडक्यात सांगा.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?