Advertisements
Advertisements
Question
नागरी वस्तींच्या समस्या
Solution
नागरी वस्त्यांची स्वतःची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. येथे प्रामुख्याने द्वितीयक व तृतीयक उदयोग आणि सेवा क्षेत्रांचा विकास होतो. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे साहजिकच नागरी क्षेत्राचे आकर्षण असते. यामुळे एकंदरीतच नागरी वस्ती सतत वाढत असते, मात्र यामुळेच नागरी वस्त्यांच्या काही स्वतःच्या समस्या निर्माण होतात.
लोकसंख्येची वाढ ही नागरी वस्त्यांची एक प्रमुख समस्या आहे. नागरी वस्ती सतत वाढत असल्यामुळे लोकसंख्येच्या आधारे यांचे संक्रमण होत असते. छोट्या शहराचे मोठ्या नगरात, नगराचे महानगरात आणि महानगराचे अतिविशाल नगरात किंवा नगर समूहात रूपांतर होते. अशा फार मोठ्या नागरी वस्तीचे व्यवस्थापन आणि प्रशासन करणे जिकरीचे ठरते. याचा परिणाम म्हणून नागरी वस्त्या बाह्य क्षेत्रात वाढत जातात, त्यातून उपनगरांची निर्मिती होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून पाणीपुरवठा, वाहतूक, सांडपाणी विल्हेवाट, शिक्षणाच्या सोयी, वैद्यकीय सोयी अशा नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतो. वाढत्या लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्यांची अनियंत्रित वाढ होते. वाहतूक कोंडी, हवा आणि ध्वनिप्रदूषण कारखान्यातून होणारे प्रदूषण दूषित पाण्याची समस्या अशा विविध समस्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत जाते.
काही वेळेस नागरी क्षेत्राच्या सीमावर्ती प्रदेशात विशेषतः संक्रमण क्षेत्रात नागरी ग्रामीण भूमी उपयोजनातही थोडे संघर्ष बघायला मिळतात. सीमावर्ती प्रदेशातील ग्रामीण भागातील लोकांना शहरांचे आकर्षण असते. मात्र त्याच वेळेस त्यांना आपली ग्रामीण ओळख टिकवायची असते. या संक्रमणामुळे काही वेळेस स्थानिक प्रशासनात संघर्ष निर्माण होतात. ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि नागरी क्षेत्रातील नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अधिकार क्षेत्रात असे संघर्ष दिसून येतात.
थोडक्यात, नागरी वस्त्यांचे स्थान, त्यांची भविष्यकालीन वाढ, तेथील सेवा-सुविधा आणि त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होणारा ग्रामीण क्षेत्रावरील प्रभाव यातून नागरी वस्तींच्या स्वतंत्र समस्या निर्माण होतात.